धक्कादायक : आईच्या प्रियकराने केला 14 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार
पिंपरी(वास्तव संघर्ष ): पिंपरी चिंचवड शहरात एक अतिशय संतापजनक घटना घडली. आईच्या प्रियकरानेच 14 वर्षीय मुलीवर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केला. शहरातील रावेत परिसरात हा प्रकार घडला. पीडित मुलीने हिम्मत दाखवून घडलेला प्रकार आपल्या वर्गशिक्षिकेला सांगितला. त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिल्याने हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली.
पंकज असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर बाल लैंगिक अत्याचार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी पंकज आणि पीडितेची आई एका ठिकाणी कामाला आहेत. दोघांचे अनैतिक प्रेमसंबंध असल्याने आरोपी हा पीडितेच्या घरी येत जात होता.
एकेदिवशी पीडितेची आई घरी नसताना आरोपी घरी आला. त्याने अल्पवयीन मुलीवर अनैसर्गिक अत्याचार केला. घडलेला प्रकार पीडितेने आपल्या आईने सांगितला. पण तुला भास झाला असेल असं म्हणत आईने तिच्याकडे दुर्लक्ष केलं. त्यानंतर पुन्हा काही दिवसांपूर्वी आरोपीने पीडितेसोबत अनैसर्गिक अत्याचार केला.
तेव्हा पीडिता मानसिक तणावात गेली. तिने घडलेल्या प्रकाराची माहिती आपल्या वर्गशिक्षिकेला सांगितली. त्यानंतर शाळेतील शिक्षकांनी पोलिसांना शाळेत बोलावून घेत. महिला पोलिसांनी पीडितेची फिर्याद ऐकून घेतली. त्यानंतर आरोपी पंकज याला रावेत पोलिसांनी अटक केली.