विरोधी पक्षातील आमदारांना अंधारात भेटण्यापेक्षा त्यांना वर्षा बंगल्यावरच बोलावून घ्या-अजितदादाचा टोला
पुणे (वास्तव संघर्ष) विरोधी पक्षातील आमदार मुख्यमंत्र्यांना अंधारात येऊन भेटतात. आमदारांवर त्यांच्या पक्षाच्या नेत्यांची पकड नाही, असे विधान चंद्रकांत पाटील यांनी सोलापुरात बोलताना केले होते. या विधानावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चोख प्रत्युत्तर दिले.
विरोधी पक्षातील आमदारांना अंधारात भेटण्यापेक्षा त्यांना वर्षा बंगल्यावरच बोलावून घ्या. तेथे सीसीटीव्ही तसेच इतर सुविधाही असल्याने तेथेच बसून चर्चा करा. माञ लोकप्रतिनिधींबद्दल गैरसमज निर्माण करण्याचे काम थांबवा एका कार्यक्रमानिमित्त पवार पुण्यात आले होते, यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
पवार पुढे म्हणाले की, चंद्रकांत पाटील यांच्याकडे महत्त्वाची खाती आहेत. त्यांच्यावर प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. चंद्रकांत पाटलांना वेगवेगळी राजकीय विधाने करण्याची सवय आहे. त्यांचा स्वभावही तसाच आहे. पण स्वभावाला औषधे नसते. पण एका पक्षाच्या जबाबदार व्यक्तीकडून अशी विधाने होता कामा नये. त्यांनी जनतेच्या मनामध्ये गैरसमज निर्माण करण्याचे काम करू नये, असा सल्ला पवार यांनी पाटील यांना दिला.