बिल्डरच्या ब्लु प्रिंटची एकच चर्चा ;गांधीनगर पुर्नवसनात मोठा ‘झोल’
पिंपरी(वास्तव संघर्ष ): पिंपरीतील गांधीनगर झोपडपट्टीतील नागरिकांना खोटी माहिती देऊन दिशाभूल करत जबरदस्तीने संमती घेण्याचे काम सध्या सुरू आहे. स्थानिकांना जागेवरच घर मिळावे अशी येथील नागरिकांची मागणी असताना याबाबत गांधीनगर झोपडपट्टी पुनर्वसन गृहनिर्माण संस्थेने झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे यांना काही दिवसापुर्वी निवेदन दिले होते मात्र असे असताना देखील येथील पुनर्वसन करणा-या बिल्डरच्या ब्लु प्रिंटची चर्चा या भागात जोर धरत आहे.
गांधीनगर झोपडपट्टीचे सन २००० मध्ये ‘मशाल’ या संस्थेमार्फत सर्वेक्षण करण्यात आले होते. याठिकाणी १ हजार ४५० इतक्या झोपडीधारकांची नोंद सर्वेक्षणात करण्यात आली होती. तर आजमितीला ३२ हजार ७१४ चौरस मीटर इतक्या क्षेत्रफळ जागेवर गांधीनगर वसलेले असून साधारण ३ हजार ५०० झोपडीधारक आहेत. या जागेवर महापालिकेचा दवाखाना, खेळाचे मैदान, शाळा तसेच रिटेल मार्केट याचे आरक्षण आहे.
पण खरा ‘झोल’ इथेच आहे या आरक्षित खेळाच्या मैदानावर दहा ते पंधरा वर्ष झाले असून अद्याप खेळाच्या मैदानावर आरक्षित असलेल्या जागेवर खेळाचे मैदान का बनवले नाही याचा मागोवा काढला असता पुनर्वसन करणा-या बिल्डरच्या ब्लु प्रिंटमध्ये या आरक्षित खेळाच्या मैदानवरच संपुर्ण गांधीनगर झोपडपट्टीचे पुनर्वसन करण्यात येणार असून बाकीची जागा बिल्डर आपल्या घशात घालून गोरगरिबांचे वाटोळे करणार हे नक्की.
अन्यथा ॲड.दिपक साबळे कोर्टात दाद मागणार..!
गांधीनगर झोपडपट्टी ही १९७२ नंतर ‘कसल त्यांची जमीन राहील त्यांचे घर’ या कायद्याप्रमाणे वसली असून सुप्रीम कोर्टाने देखील वीस वर्ष झोपडपट्टीत राहणा-यांच्या नावावर झोपडीचे मालकी हक्क दिले आहेत. मात्र असे असताना देखील झोपडपट्टीतील रहिवाशांना बेघर करण्याची धमकी दिली जात आहे तसेच मुळ मालक हेच हक्कदार आहेत अशी भिती पसरवून त्यांचे जबरदस्तीने संमतीपत्र घेण्याचे काम सुरू आहे.गांधीनगर झोपडपट्टी १५ एकर जागेवर वसली असून जागेचा संपुर्ण वापर पुनर्वसनासाठी वापरण्यात यावा पुनर्वसन प्रकल्प हा एकाच बांधकाम व्यवसायिकामार्फत एकाच वेळी व तुकड्या तुकड्यांमध्ये न करता सर्व नागरिकांना जास्तीत जास्त सुविधा मिळतील या दृष्टीने राबविला जावा. गार्डनसाठी आरक्षित असलेल्या जागेवर लवकरात लवकर गार्डन बनवावे स्थानिकांना जागेवरच घर न दिल्यास न्यायालयात दाद मागणार.
माहिती अधिकारात माहीती मागवल्याने बिल्डर कडून धमकी…
याबाबत माहिती अधिकारात माहिती मागवल्याने बिल्डर कडून अॅड. उमेश खंदारे या तरुणाला फोन करून धमकावण्याचा प्रकार समोर आला आहे. यामध्ये संबंधित बिल्डरकडून गांधीनगर झोपडपट्टी चे पुनर्वसन करण्यासाठी एस आर ए ऑफिस येथे प्रस्ताव दाखल केलेला आहे. परंतु, सदर पुनर्वसन प्रकल्प राबवीत असताना या प्रकल्पात किती इमारती असणार?, सदनिकेचे चटई क्षेत्रफळ किती चौरसफुटांच्या असणार?, येथील प्रत्येक दांपत्याला घर मिळणार का?, भाड्याने इमारतीत स्थलांतर केले तर त्याचे मासिक शुल्क कोण देणार व ते किती असणार?, इथे कुठल्या सुख सोयी नागरिकांना दिल्या जाणार?, किती क्षेत्रफळात हा संपूर्ण प्रकल्प राबविला जाणार आहे? अशा एक ना अनेक अनेक प्रश्नांची उत्तरे मागितली असता धमकी देण्यात आली.