बातम्यामहाराष्ट्रमाझं पिंपरी -चिंचवड

राजकीय भूंकंप :आमदार महेश लांडगेंवर शिस्तभंगाची कारवाई होणार?

पिंपरी : भोसरी विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार महेश लांडगे हे पक्षापेक्षा स्वतःला मोठे समजत आहेत. आमदार लांडगे यांच्याकडून शहरात करण्यात येणाऱ्या जाहीरातबाजीत भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा फोटो छापला जात नाही. भाजपमध्ये आमदार मोठा नसून पक्ष मोठा आहे. आमदार महेश लांडगे यांच्या या कार्यपद्धतीमुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. ही नाराजी आणखी वाढू नये यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आमदार महेश लांडगे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी पिंपरी-चिंचवड शहर भाजपचे चिटणीस सचिन काळभोर यांनी केली आहे. जर आमदार महेश लांडगे यांच्यावर भाजप पक्षश्रेष्ठीने

शिस्तभंगाची कारवाई केली तर पिंपरी चिंचवड शहरातील हा मोठा राजकीय भुंकंप मानला जाईल. त्यामुळे आमदार महेश लांडगे यांच्या एककल्ली आणि पक्षाला फाट्यावर मारण्याच्या राजकीय प्रवृत्तीला आता भाजप पक्षश्रेष्ठी चाप लावतात का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

यासंदर्भात भाजपचे चिटणीस सचिन काळभोर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, “पिंपरी-चिंचवड शहरात तीन विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यातील चिंचवड आणि पिंपरी या दोन विधानसभा मतदारसंघात भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याकडून विविध सांस्कृतिक, धार्मिक किंवा राजकीय कार्यक्रम राबविण्यासाठी तयार करण्यात येणाऱ्या फ्लेक्सवर भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा प्राधान्याने फोटो लावण्यात येतो. मात्र भोसरी विधानसभा मतदारसंघात भाजप आमदार महेश लांडगे यांच्याकडून लावण्यात येणाऱ्या कोणत्याच फ्लेक्सवर भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा फोटो छापला जात नाही. पक्षामध्ये आधी शहराध्यक्षांना मान असतो. खासदार असो की आमदार असो भाजपमध्ये पक्ष संघटना मोठी आहे.

मात्र आमदार महेश लांडगे हे पक्ष संघटनेलाच फाट्यावर मारत आले आहेत. ते स्वतःला पक्षापेक्षा मोठे समजत आहेत. भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या पदाला एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाला. या एक वर्षात आमदार महेश लांडगे यांनी त्यांच्या फ्लेक्सवर स्वपक्षाच्या शहराध्यक्षांचाच फोटो कधी छापला नाही. आमदार लांडगे यांना स्वतःची ताकद म्हणजेच पक्षाची ताकद वाटत आहे. ते पक्षामुळे निवडून आले आहेत याचा विसर कदाचित त्यांना पडला आहे. आमदार लांडगे यांच्या अशा या कारभारामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. विधानसभा निवडणुकीत या नाराजीचा स्फोट झाल्यास त्याचे परिणाम पक्षाला भोगावे लागतील. आमदार महेश लांडगे म्हणजे पक्ष नाही हे दाखवून देण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी लांडगे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.”

दरम्यान, भाजप चिटणीस सचिन काळभोर यांनी आमदार महेश लांडगे यांच्या चुकीच्या कारभाराला कायमच विरोध केलेला आहे. भोसरी विधानसभा मतदारसंघात कोट्यवधी रुपये खर्च करून नागरिकांना आखाड पार्टी देण्याच्या संस्कृतीलाही सचिन काळभोर यांनी विरोध केला होता. या आखाड पार्टीवर भ्रष्टाचारातून कमविलेल्या पैसे खर्च केले जात असल्याने त्याची ईडीमार्फत चौकशी करण्याची मागणी देखील काळभोर यांनी केली होती. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली होती. आता पक्षाला कायम फाट्यावर मारणारे आमदार महेश लांडगे यांच्यावर पक्ष काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

Share this: