आपला हरवलेला मुलगा काही तासात सापडल्याने बाप ढसाढसा रडला ; वाकड पोलीसाचे होत आहे शहरात कौतुक
पिंपरी (वास्तव संघर्ष) :पिंपरी चिंचवडमधील थेरगाव परिसरातून सोमवारीं रात्री नऊ वाजताच्या सुमारास एका दहा वर्षाच्या मुलाकडून घरातील लॅपटॉप बंद पडला म्हणून भीतीने मुलाने घरातून पळून गेला . याबाबत पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर अवघ्या तीन तासात मुलाचा शोध घेऊन त्याला सुखरूपपणे पालकांच्या ताब्यात देण्यात आले .
विष्णू ज्ञानोबा कास्टे ( वय 33 , रा . वनदेव कॉलनी लेन क्रमांक एक , थेरगाव ) यांच्या दहा वर्षीय मुलाकडून घरातील लॅपटॉप बंद पडला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , एका दहा वर्षाच्या मुलाने भीतीपोटी कोणाला काहीही न सांगता घर सोडले . रात्री नऊ वाजता मुलाने घर सोडले . विष्णू आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मुलाचा सर्वत्र शोध घेतला . मात्र मुलगा मिळून आला नाही . त्यामुळे मंगळवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास कास्टे यांनी वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दिली . या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ . विवेक मुगळीकर यांनी पोलिसांना परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याच्या सूचना दिल्या .
पोलिसांनी विष्णू कास्टे यांच्या घराच्या आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यामध्ये त्यांचा मुलगा स्काय फिट या जिम जवळील बोळीमध्ये बसलेला असल्याचे आढळून आले . तीन तासाच्या आत वाकड पोलिसांनी मुलाला शोधून त्याच्या वडिलांच्या ताब्यात दिले .मुलांची आणि वडीलांची भेट होताच वडील मुलाला बिलगून ढसाढसा रडू लागले आणि म्हणाले लॅपटॉप खराब झाला म्हणून मी तुला काय बोललो का रे असं का सोडून गेलास..नातेवाईकांनी वाकड पोलीसांचे याबाबत आभार मानले.