बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

‘थँक्स अ टिचर’ अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी करा: प्रा. सोनाली गव्हाणे

पिंपरी(वास्तव संघर्ष) : देशाचे भविष्य घडविण्याचे तसेच आपल्या पाल्यांना शैक्षणिक पातळीवर विद्याविभूषित करण्याचे महत्वाचे काम शिक्षक करतात. मात्र , पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेला या कामाचे महत्व आहे की नाही? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे ‘थँक्स अ टिचर’ अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, अशी मागणी शहर सुधारणा समितीच्या सभापती प्रा. सोनाली गव्हाणे यांनी केली आहे.
याबाबत महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, शिक्षण क्षेत्रांमध्ये मोलाचे योगदान देणाऱ्या शिक्षकांच्या प्रती आदर व्यक्त करण्यासाठी शिक्षक दिनानिमित्त ‘थँक्स अ टीचर्स’ अभियान राबविले. अभियानाअंतर्गत शिक्षकांनी स्वखर्चाने विविध उपक्रम राबविले, परंतु त्याचे महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून मूल्यमापन आणि परिक्षण न केल्याने विद्यार्थ्यांसह शिक्षकदेखील बक्षीस वितरणाच्या प्रतीक्षेत आहेत. परिणामी ‘थँक्स अ टिचर’ अभियान कागदावर राहिल्याची चर्चा शिक्षकांमध्ये आहे.

कोरोनामुळे शाळा बंद आहेत, या पार्श्वभूमीवर नियमित शाळा सुरू नसल्या तरी देखील विविध माध्यमांद्वारे शिक्षकांमार्फत विद्यार्जनाचे काम सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. या काळात विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शालेय शिक्षण विभागराज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (एमएससीईआरटी) आणि शिक्षण विभाग महापालिका यांच्या वतीने २ ते १० सप्टेंबर या कालावधीत थँक्स अ टीचर्स अभियान घेतले. त्यातसर्व व्यवस्थापनाच्या माध्यमांच्या पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कार्यक्रम राबवले.

त्यामध्ये शालेय स्तरावर निबंध लेखन, काव्य वाचन, काव्य लेखन, चित्रकलास्पर्धा, वत्कृत्व स्पर्धा अशा विविध उपक्रमांचे ऑनलाइन ऑफलाइन स्वरूपात आयोजन केले होते. शिक्षकांना प्रोत्साहन मिळण्यासाठी त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. यामध्ये शाळा, विद्यार्थी, पालक, लोकप्रतिनिधी, विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनीही शाळेविषयी व शिक्षकांविषयीच्या भावना या सर्व स्पर्धेच्या स्वरूपात व्हिडिओ, शुभेच्छापत्र, काव्यलेखन, कवितावाचन या पद्धतीने पोस्ट सोशल मीडियावर शेअर केल्या. सर्व शिक्षक सर्व मुले एवढे छान छान उपक्रम साजरे करतात. पण , महापालिका दखलच घेत नसल्याची खंत काही शिक्षकां व्यक्त करत आहेत. याची दखल घेणे आवश्यक आहे, असेही प्रा. गव्हाणे यांनी म्हटले आहे

Share this: