सलून दुकानदारांच्या डोक्यात उलटा कोयता घालून केले गंभीर जखमी
दापोडी (वास्तव संघर्ष): पिंपरी चिंचवड शहरातील दापोडी परिसरात टोळक्याने राडा करत सलून दुकानाची तोडफोड करून दहशत निर्माण केली आहे. तसेच कोयता उलट्या बाजूने मारून दुकानदाराला दुखापत केली. ही घटना दापोडी येथे शुक्रवारी (दि.10 ) रोजी सायंकाळी सातच्या सुमारास घडली.
समसाद रफिक शाह (वय-22, रा. दापोडी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
ओमकार गायकवाड, राम कांबळे, सैफाली रैन (तिघेही रा. दापोडी) आणि एक अनोळखी या आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी समसाद यांचे दापोडी येथे न्यू स्टेटस सलून नावाचे केस कापण्याचे दुकान आहे.आरोपी ओमकार,आरोपी राम,आरोपी सैफाली हे फिर्यादीच्या दुकानात आले.आरोपी ओमकार याने त्याच्या हातातील लोखंडी कोयता उलट्या बाजूने फिर्यादी समसाद यांच्या डोक्यात मारून दुखापत केली. आम्ही दापोडीचे भाई आहोत,आमचे पोलीस स्टेशनला भरपूर गुन्हे दाखल आहेत. तू इथून पुढे आम्हाला हप्ता द्यायचा, अशी धमकी आरोपींनी दिली.तसेच दुकानाच्या बाहेर येऊन लाकडी दांडक्यांनी दुकानाच्या दरवाजावर मारून दुकानाचे नुकसान करत दहशत निर्माण केली. अधिक तपास भोसरी पोलीस करीत आहेत.