रस्त्यावरील, फुटपाथवरील नादुरुस्त वाहने हटवण्यासाठी शेवटची संधी
पिंपरी (वास्तव संघर्ष) : पिंपरी चिंचवड शहरातील रस्त्यावरील, फुटपाथवरील उड्डाणपुलाखालील अथवा इतर ठिकाणच्या बंद अवस्थेतील, बेवारस, नादुरुस्त वाहने, त्यांचे सांगाडे काही वाहन मालकांनी स्वत:हून काढून घेतली आहेत. मात्र नोटीस बजावून देखील जी वाहने हटवण्यात आली नाहीत अशा वाहनांवर आता महापालिकेच्या वतीने कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे. महापालिकेच्या वतीने कारवाई होवू नये म्हणून संबंधित वाहन मालकांनी अशी वाहने तातडीने हटवावित, असे आवाहन आयुक्त राजेश पाटील यांनी केले आहे.
केंद्र शासनाकडुन स्वच्छ सर्वेक्षण २०२२ स्पर्धेची घोषणा करण्यात आलेली असुन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने या स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे / स्टार मानांकन प्राप्त करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्याकरीता शहर स्वच्छ व सुंदर राखणे आवश्यक आहे. पिंपरी चिंचवड मनपाच्या रस्त्यावर, उड्डाणपुलाखाली व इतरत्र मनपाच्या मालकीच्या जागेवर अनेक ठिकाणी बरीच बेवारस वाहने धुळीने माखलेल्या अवस्थेमध्ये सोडुन दिलेली तसेच अनधिकृतपणे पार्क केलेली दिसतात. त्यामुळे रस्त्यावर अस्वच्छता दिसुन येते.
त्यामुळे पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील मनपाच्या रस्त्यावरील, फुटपाथवरील, उड्डाणपुलाखालील व इतर ठिकाणच्या बंद अवस्थेतील, बेवारस, नादुरुस्त वाहने त्यांचे सांगाडे हटविण्याची संधी संबंधित वाहन मालकांना देण्यात आली होती. याबाबत संबंधितांना नोटीस देखील बजावण्यात आली होती. त्यानंतर महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयामार्फत अशी वाहने हटविण्याची कारवाई सुरु करण्यात आली. अशा वाहनांवर नोटीसा देखील चिकटविण्यात आल्या. त्यानंतर बरीचशी वाहने संबंधित वाहन मालकांनी काढून घेतली आहे. मात्र नोटीसा देऊन देखील हटविण्यात न आलेल्या वाहनांवर आता महापालिका प्रशासनाने कारवाईला सुरुवात केली आहे. नोटीस कालावधी संपुष्टात आल्या नंतर सर्व क्षेत्रीय कार्यालयाकडील अतिक्रमण विभागामार्फत त्या वाहनांवर कारवाईचे नियोजन प्रभाग पातळीवर करण्यात आले आहे.