आयुक्त राजेश पाटील यांनी प्रशासक म्हणून स्विकारला कार्यभार
पिंपरी(वास्तव संघर्ष) : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे प्रशासक म्हणून आयुक्त राजेश पाटील यांनी आज कार्यभार स्विकारला. पिंपरी चिंचवड महापालिकेची विद्यमान मुदत दि.13 मार्च 2022 रोजी संपुष्टात आली आहे.महापालिका पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुका अद्याप घोषित झालेल्या नाहीत.
या पार्श्वभूमीवर महापालिकेचा कारभार पाहण्यासाठी प्रशासक नियुक्त करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने घेतला. त्यांनी निर्गमित केलेल्या आदेशान्वये आणि महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रशासक पदी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विद्यमान आयुक्तांची नियुक्ती राज्य शासनाच्या वतीने करण्यात आली आहे.
त्यानुसार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त असणारे राजेश पाटील यांनी प्रशासक पदाचा कार्यभार आज दि. 14 मार्च 2022 रोजी स्विकारला.