मंदिरांमध्ये चोरी करणा-या सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी केली अटक
सांगवी- परिसरातील मंदिरांमध्ये चोरी करणारा सराईत गुन्हेगाराला सांगवी पोलिसांनी दहा तासाच्या आत अटक केली. आरोपीकडून मंदिरातून चोरलेल्या पुरातन वस्तू आणि रोख रक्कम असा एकूण १ लाख २३ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. यामुळे सांगवी पोलीस ठाण्यातील एका पाठोपाठ एक दाखल झालेले चार गुन्हे उघडकीस आले आहेत.
अक्षय अनिल साळवे (वय 23, रा. लक्ष्मी नगर, पिंपळे गुरव. मूळ रा. बौद्ध वस्ती, मोरगाव गणपती मंदिराच्या मागे, मोरगाव, ता. बारामती) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी पहाटे सांगवी परिसरात चोरीचे चार गुन्हे दाखल झाले. हे सर्व गुन्हे मंदिरामध्ये झाले असून चोरट्याने मंदिरातील पुरातन वस्तू आणि दानपेटी फोडून त्यातील रक्कम चोरून नेली होती. त्याबाबत तपास पथकाला सूचना देऊन परिसरात गस्तीसाठी पाठवले.
गस्त घालत असताना पोलीस नाईक सुरेश भोजणे यांना मंदिरात चोरी करणारा संशयित आरोपी लक्ष्मी नगर, पिंपळे गुरव या भागात येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सांगवी पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन अक्षय साळवे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने एका मंदिरात चोरी केल्याचे सांगितले. त्यावरून त्याला अटक केली. पोलीस कोठडीत असताना त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने पिंपळे गुरव परिसरातील चार मंदिरांमध्ये चोरी केल्याचे कबूल केले. पोलिसांनी त्याच्याकडून मंदिरातील पुरातन वस्तू, टीव्ही आणि रोख रक्कम असा एकूण १ लाख २३ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला.
ही कामगिरी पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन शिंदे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रसाद गोकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश आव्हाड, पोलीस उपनिरीक्षक योगेश साळुंखे, पोलीस कर्मचारी पारधी, ए. पी. आय बो-हाडे, केंगले, भोजने, विनायक देवकर, अनिल देवकर, देशमुख, बावस्कर, बन्ने, बनसोडे यांच्या पथकाने केली