बातम्या

‘राम मंदिर बांधायच नसतं हो फक्त त्याचं राजकारण करायचं असतं-मनसे

पुणे (वास्तव संघर्ष) शिवसेनेने पुन्हा एकदा राम मंदिराच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेतली आहे. अयोध्येत राम मंदिर उभारण्यात यावे यासाठी शिवसेनेने चलो अयोध्येचा नारा दिल्यानंतर तोच कित्ता गिरवत शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी पंढरपूर येथील सभेत देखील राम मंदिराचा मुद्दा मांडला होता.

विरोधकांनी शिवसेनेवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. त्यातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनीही शिवसेनेवर कुरघोडी केली आहे..

मुळशी पॅटर्न या चित्रपटातील डायलॉग ‘शेती ईकायची नसते हो राखायची असते’ याला उपरोधिक म्हणून ‘राम मंदिर बांधायच नसतं हो फक्त त्याचं राजकारण करायचं असतं’ असं लिहिलेले पोस्टर्स मनसेने पुणे परिसरातील कसबा मतदारसंघात फलकावर लावली आहेत.शिवसेना आणि मनसे यांच्यामध्ये पोस्टरयुद्ध याआधीही दिसलं होत.

यापूर्वीही शिवसेनेविरोधात पोस्टरबाजी करुन ‘अयोध्येला निघालो जोशात, राजीनामे मात्र अजूनही खिशात’ असं लिहिलेले पोस्टर्स मनसेने शिवाजी पार्क परिसरातील सेना भवनाच्या समोरच लावली होती .आता पुण्यातील या फलकांमुळे मनसेने शिवसेनेला पुन्हा डिवचले आहे. उद्धव ठाकरेंच्या पहले मंदिर फीर सरकारच्या पार्श्वभूमीवर मनसेची खोचक पोस्टरबाजी सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.आता ही खोचक फलकबाजी शिवसेनेविरोधात आहे की भाजपा विरोधात आहे हा कुतुहलाचा विषय आहे.

Share this: