क्राईम बातम्याबातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुक : तब्बल 14 लाख रुपयांची रोकड जप्त

पिंपरी (वास्तव संघर्ष): चिंचवड विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक विभागाकडून चिंचवड दळवीनगर येथून एसएसटी पथकाला एका वाहनातून सुमारे 14 लाख रुपयांपेक्षा अधिकची रोकड आज दुपारी आढळून आली आहे. पुढील तपासासाठी सदर संशयित रक्कम आयकर विभागाकडे सुपूर्द करण्यात आली आहे

चिंचवड विधानसभा मतदार संघाची पोटनिवडणूक सुरु आहे. आज शुक्रवारी (दि.24)रोज निवडणूकीचा प्रचार बंद करण्यात आला असून 28 उमेदवार रिंगणात आहेत. त्या पार्श्वभूमीवर निवडणूक विभागाने विविध अॅक्टीव्ह केली आहेत. पोटनिवडणूकीत पैशांचे वाटप होऊ नये, यासाठी चिंचवड विधानसभा मतदार संघातील विविध भागात “स्टॅटिक सर्व्हिलन्स” पथकांकडून वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे.आज (शुक्रवारी) दुपारी दळवीनगर येथे पैसे मिळाले  असून पुढील तपासासाठी सदर संशयित रक्कम आयकर विभागाकडे सुपूर्द करण्यात आली आहे.

एसएसटी पथकाद्वारे  चिंचवड विधानसभा मतदारसंघात विविध भागात वाहनांची तपासणी करण्यात येत असून 24×7 हे पथक कार्यरत आहे. या पथकाद्वारे धडक कारवाई करण्यात येत असून आचारसंहिताभंगाबाबत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यादृष्टीने   बारकाईने नजर ठेवली  जात आहे. हे पथक नाका, चेकपोस्ट अशा ठिकाणी तपासणी करीत आहे. या पथकामार्फत मतदानापूर्वी शेवटच्या 72 तासात कामकाज अधिक बळकट करण्यात आले आहे. मतदारांवर बेकायदेशीररित्या प्रभाव टाकणे, त्यांना प्रेरित करणे या गोष्टींवर आळा घालण्याची महत्वाची जबाबदारी या पथकावर आहे.

 चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहितेचा अंमल सुरु असून कोणत्याही प्रकारे या आचारसंहितेचा भंग होणार नाही याची दक्षता सर्व सबंधित पथकांनी घ्यावी, असे निर्देश निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी दिले आहे.निवडणूकीच्या अनुषंगाने कोणताही अनुचित प्रकार खपवून घेतला जाणार नाही. नियमांचे उल्लंघन करणा-यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही  श्री.ढोले यांनी दिला आहे.   

Share this: