बातम्यामहाराष्ट्रमाझं पिंपरी -चिंचवड

आमदार महेश लांडगे होणार शहरातील पहिले मंत्री?

पिंपरी (वास्तव संघर्ष): सर्वोच्च न्यायालयच्या निर्णयानंतर मंत्रिमंडळ विस्ताराची अडचण दूर झाली आहे.  शिंदे-फडणवीस सरकारमधील अनेक आमदारांना मंत्रिमंडळ विस्ताचे वेध लागले आहेत. अशातच बच्चू कडू यांनी येत्या 21 ते 26 मेपर्यंत मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचा मोठा दावाही  केला आहे. राज्यात विकास कामं करायची असतील तर मंत्रिमंडळ विस्तार होणं आवश्यक आहे. या मंत्रीमंडळामध्ये पिंपरी- चिंचवडमधून भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे यांना संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. कॅबिनेट नाही तर किमान राज्यमंत्रीपद लांडगे यांना मिळेल अशी जोरदार चर्चा शहराच्या राजकीय वर्तुळात आहे. लांडगे यांना मंत्रीपद मिळाल्यास ते शहरातील पहिले मंत्री ठरतील.

शहरात भाजपचे दोन आमदार आहेत. चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे दुखःद निधन झाल्यावर पोटनिवडणुकीत आमदार अश्विनीताई जगताप मोठ्या मताधिक्याने निवडून आल्या.यामध्ये शहराध्यक्ष म्हणून आमदार महेश लांडगे यांनी सिंहाचा वाटा घेतला.भोसरीचे आमदार महेश लांडगे सलग दोनदा आमदार आहेत.2014 मध्ये अपक्ष निवडून आल्यानंतर महेश लांडगे यांनी भाजप सरकारला पाठिंबा दिला होता. भाजपचे सहयोगी सदस्यत्व स्वीकारले होते. जगताप, लांडगे यांनी 2017 मध्ये पिंपरी- चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता उलथवून टाकली.

महापालिकेवर भाजपचे कमळ फुलविले होते. त्याची बक्षिसी म्हणून दोघांपैकी एकाला मंत्रिमंडळात संधी मिळेल अशी चर्चा होती. 2014 ते 2019 राज्यात भाजप-शिवसेना युतीचे सरकार असताना प्रत्येक मंत्रिमंडळ विस्तारावेळी जगताप, लांडगे यांच्या नावाची चर्चा झाली. पण, शेवटपर्यंत दोघांना मंत्रिमंडळात संधी मिळाली नाही. .

2019 मध्ये भाजपचे सर्वाधिक आमदार निवडून आले. पण, महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्याने मंत्रीपद मिळण्याची शक्यता संपली होती. परंतु, आता महाविकास आघाडी सरकार गेले आहे. त्यामुळे राज्यात शिंदे-फडणवीस सरकार असल्याने या मंत्रिमंडळात शहरातून महेश लांडगे यांची वर्णी लागेल असे बोलले जात आहे. त्यासाठी काही सबळ कारणे दिली जात आहेत. मागीलवेळी अपक्ष असलेले लांडगे आता भाजपचे आमदार आहेत.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास संपादन केला असून अतिशय विश्वासू झाले आहेत. गोवा विधानसभा निवडणुकीत फडणवीस यांनी दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडली. भाजपचे चिंचवडचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर लागलेल्या पोटनिवडणुकीत आमदार महेश लांडगे यांनी सिंहाचा वाटा घेत विजय मिळवला.पिंपरी-चिंचवड महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक तोंडावर आली आहे. महापालिकेत पुन्हा भाजपची सत्ता आणण्यासाठी लांडगे यांना ताकद देणे गरजेचे आहे. लांडगे यांना मंत्रीपद मिळाल्यास ते शहरातील पहिले मंत्री ठरतील.

Share this: