वास्तव संघर्षची बातमी ठरली खरी; भाजप शहराध्यक्षपदी शंकर जगताप यांची नियुक्ती
पिंपरी (वास्तव संघर्ष) : 8 मार्च 2023 रोजी वास्तव संघर्षने भाजप शहराध्यक्षपदी शंकर जगताप यांची नियुक्ती होणार असे भाकित वर्तवले होते .आज 19 जूलै 2023 रोजी या बातमीवर शिक्कामोर्तब झाले असून भाजपच्या पिंपरी चिंचवड शहराध्यक्षपदी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे लहान बंधु आणि विद्यमान आमदार अश्विनीताई जगताप यांचे दिर शंकर जगताप यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांची आज पत्राद्वारे नियुक्ती केली आहे. भाजपचे आमदार महेश लांडगे यांचा शहराध्यक्ष पदाचा कार्यकाल संपल्यामुळे त्यांच्या जागी शंकर जगताप यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप यांना शहराध्यक्षपद देण्यासाठी राज्यातील वरिष्ठ नेत्यांनी हिरवा कंदील दाखवला होता. भाजपची राज्य कार्यकारिणी ५ मे रोजी जाहीर झाल्यानंतर राज्यातील जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष १५ मे आणि नंतर २० मे पर्यंत जाहीर होतील, असे सांगण्यात आले होते. त्यानंतरही नियुक्त्या झाल्या नव्हत्या.शंकर जगताप हे पिंपरी चिंचवड महापालिकेत नगरसेवक होते. चिंचवड विधानसभा पोटनिवडणुक लढविण्यासाठी तीव्र इच्छुक होते. परंतू, पक्षाने लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी दिली होती.