पिंपरी-चिंचवडमध्ये देशातील सर्वात मोठे अश्व- देशी गोवंश पशु प्रदर्शन
- अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचा लक्षवेधी उपक्रम
- देशभरातून सुमारे १ हजाराहून अधिक पशुपालकांची नोंदणी
पुणे (वास्तव संघर्ष )। प्रतिनिधी :
गोवंश संवर्धनाचा संदेश देण्यासाठी पिंपरी-चिंचवडमध्ये महाराष्ट्रातील सर्वात मोठे अश्व व देशी गोवंश पशू प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील पशू पालकांना ‘रेकॉर्ड ब्रेक’ उपक्रमात सहभागी होण्याची संधी निर्माण झाली आहे. या प्रदर्शनासाठी देशभरातून पशूपालकांनी नोंदणी केली आहे.
बैलगाडा शर्यत बंदी उठवण्यासाठी गल्लीपासून दिल्लीपर्यंत यशस्वी लढा उभारणारे आणि गोसंवर्धनासाठी चळवळ उभी करणारे गोरक्षक आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या पुढाकाराने पुणे जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवडमध्ये आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र, मोशी येथे दि. २५ व २६ नोव्हेंबर २०२३ रोजी भव्य देशी गोवंश प्रदर्शन व पशु आरोग्य शिबीर भरविण्यात येणार आहे.
भारतातील सर्व जातीचे अश्व व गोवंश पशू प्रदर्शन तसेच आरोग्य शिबीरासह एकूण १७ प्रकारातील पशूंचा‘ रॅम्प वॉक’ असलेले हे देशातील पहिले देशी गोवंश पशू प्रदर्शन आहे. देवनी, खिल्लार, लाल कंधारी, साहिवाल, लाल सिंधी, गीर, ओंगोले, वेचूर अशा विविध गोवंशासाठी प्रजातिनिहाय स्पर्धा घेण्यात येणार आहे. स्पर्धेमध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय असे क्रमांक काढण्यात येणार आहेत. पहिल्या क्रमांकाच्या गोवंश आणि पशूंचे ‘रॅम्प वॉक’ होणार आहे, असा प्रयत्न भारतात प्रथमच होत आहे.
भावी पिढीला गोवंशाचे महत्त्व कळावे…
कोविड सारख्या महामारीच्या काळात देशी गोवंशाचे आणि त्याच्या उत्पादनाचे महत्त्व जगाला कळले आहे. त्यामुळे याबाबत जनजागृती आणि गो संवर्धनाचा संदेश तळागाळात पोहोचला पाहिजे. तसेच, पुणे जिल्ह्यातील शासकीय व अशासकीय शाळांच्या विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी. ज्यामुळे भावी पिढीलासुद्धा गोवंशाचे महत्त्व कळेल. गतवर्षी खिल्लार या एकाच प्रकारातील प्रदर्शनामध्ये २५० हून अधिक गोवंश सहभागी झाले होते. यावर्षी विविध देशी प्रजातींचे १ हजाराहून अधिक पशू प्रदर्शनामध्ये सहभागी होतील, असा अंदाज आयोजकांनी व्यक्त केला आहे. या प्रदर्शनाच्या निमित्ताने आरोग्य शिबिरासाठी वैद्यकीय पथक सज्ज करण्यात आले आहे.