बातम्यामहाराष्ट्रमाझं पिंपरी -चिंचवड

ग्वांगझू आंतरराष्ट्रीय पुरस्कार स्पर्धेमध्ये पिंपरी- चिंचवड शहराचा सन्मान

पिंपरी (वास्तव संघर्ष) : पिंपरी चिंचवडमहापालिकेच्या वतीने राबविण्यात आलेल्या नवी दिशा या उपक्रमाची  दखल जागतिक पातळीवर घेण्यात आली असून सन्मानाचा समजला जाणारा ग्वांगझू आंतरराष्ट्रीय पुरस्कार स्पर्धेमध्ये पिंपरी-चिंचवड शहराला सन्मान पदकाने गौरविण्यात आले.

चीनमधील ग्वांगझू येथे ग्वांगझू सचिवालयात हा सन्मान सोहळा पार पडला. महापालिकेच्या समाजविकास विभागाचे उप आयुक्त अजय चारठाणकर, आरोग्य विभागाचे सहाय्यक आयुक्त यशवंत डांगे, समुह संघटिका वैशाली खरात आणि सीटीओच्या प्रज्ञा ठाकूर यांनी आयुक्तांच्या वतीने हा पुरस्कार स्विकारला. नागरी सहभाग आणि सहकार्यामुळे महापालिकेला मिळालेला हा बहुमान असून शहरवासीयांप्रती आयुक्त शेखर सिंह यांनी पुरस्कारप्राप्तीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.

महापालिकेच्या वतीने नवी दिशा उपक्रम राबविला जात आहे. या माध्यमातून शहरातील सामुदायिक शौचालयांचे देखभाल करण्याचे काम आर्थिक मोबदला देऊन महिला बचत गटांना देण्यात येत आहे. यामुळे महिलांना आर्थिक उत्पन्नाची संधी उपलब्ध झाली आहे.

या महत्वाकांक्षी उपक्रमाची दखल जागतिक पातळीवर घेण्यात आली. ग्वांगझू आंतरराष्ट्रीय पुरस्कार स्पर्धेमध्ये 54 देशांतील 193 शहरांचा समावेश होता, यामध्ये पिंपरी चिंचवड शहराने नाविन्यपूर्णता, परिणामकारकता आणि शाश्वत शहरी विकासासाठी असलेली आपली वचनबद्धता दर्शवली.नवी दिशा उपक्रमाद्वारे महापालिकेने स्वच्छतेसोबत शहरातील महिला बचत गटांना रोजगार उपलब्ध करून देत कार्यक्षम प्रशासनाचे यश देखील अधोरेखित केले.

Share this: