बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

पिंपरी मतदारसंघातून सुजात आंबेडकर विधानसभा लढविणार? इच्छुकांसमोर तगडे आव्हान..! 

पिंपरी (वास्तव संघर्ष) वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आगामी विधानसभा निवडणुकीत सर्व २८८ जागांवर उमेदवार उभा करण्याची घोषणा यापूर्वीच ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. आता रिपब्लिकन पार्टी (आरपीआय) आणि भाजपचा डोळा असलेल्या पिंपरी विधानसभेकरीता थेट सुजात आंबेडकर यांना मैदानात उतरवण्याच्या हालचाली सुरू आहेत, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. तसे झाल्यास पिंपरी विधानसभेतील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.

पिंपरी विधानसभा मतदार संघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. या मतदार संघात सध्या ॲड. गौतम चाबुकस्वार यांच्या रुपाने शिवसेनेचा आमदार आहे. वास्तविक, युती झाल्यास या मतदार संघावर आरपीआयचा दावा राहणार आहे. तरीही भाजपमधून अनेकजण इच्छुक आहेत. राष्ट्रवादीनेही हा मतदार संघ पुन्हा मिळवण्यासाठी कंबर कसली आहे. शिवसेना आपले वर्चस्व कायम ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे ‘आमचं ठरलंय’, आमचं तुमच्या अगोदर ठरलंय…अशा विविध टॅगलाईनद्वारे सर्वच इच्छुकांनी सोशल मीडियावर वातावरण निर्मिती करण्याची सुरूवात केली आहे.

सुजात आंबेडकर अवघ्या २४ वर्षांचे आहेत. पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातून त्यांनी राज्यशास्त्रात पदवी घेतल्यानंतर चेन्नईच्या एशियन कॉलेज ऑफ जर्नलिझमधून पत्रकारितेचा डिप्लोमा घेतला. गेली दोन वर्षं त्यांनी अनेक राष्ट्रीय दैनिक आणि वेबसाईट्समध्ये मुक्त पत्रकार म्हणून काम केले आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ‘सेफ’ मतदार संघ म्हणून सुजात यांना प्रकाश आंबेडकर निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याच्या तयारीत आहेत, अशी चर्चा आहे. विशेष म्हणजे, सोलापूर लोकसभा निवडणुकीत ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या निवडणुकीची धुरा सुजात यांनी सांभाळली आहे.

दरम्यान, वंचित बहुजन आघाडीच्या वतीने किंवा ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी याबाबत कुठेही अधिकृत भूमिका व्यक्त केलेली नाही. त्यामुळे आगामी काळात ॲड. आंबेडकर कोणती भूमिका घेणार? याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

 

 

 

Share this: