गणेशोत्सवाची वर्गणी न दिल्याने व्यापारी मायलेकांवर केला खूनी हल्ला
पिंपरी (वास्तव संघर्ष ) – गणेशोत्सवाची वर्गणी न दिल्याने आठ ते दहा जणांच्या टोळक्याने व्यापारी मायलेकांवर खूनी हल्ला केला. ही घटना बुधवारी (दि.४) मध्यरात्री वाकड येथे घडली. मुकेश देवराम चौधरी (वय ३३), जमनीबाई देवराम चौधरी (५८, दोघे रा. सद्गुरू कॉलनी, वाकड) असे खूनी हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मायलेकांची नावे आहेत. रमेश देवराम चौधरी (वय ३७) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, सागर घडसिंग (रा. म्हातोबानगर, वाकड) याच्यासह अन्य ९ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी चौधरी यांचे वाकड रोड येथे ‘माताजी कलेक्शन’ नावाने कपड्याचे दुकान आहे. बुधवारी रात्री आरोपींनी आपसात संगनमत करून त्यांच्या दुकानावर अचानक हल्ला चढवला. आरोपी दुकानाच्या दरवाजाची जोरजोरात जाळी वाजवू लागल्याने मुकेश आणि त्यांची आई जमनीबाई दोघे बाहेर आले.
आरोपींनी ‘सद्गुरू कॉलनी येथील ओमसाई गणपती मंडळाला ५ हजार रुपयांची वर्गणी का देत नाही’ असे म्हणून त्यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. यावेळी आरोपी सागर याने त्याच्या हातातील लोखंडी पहार मुकेश यांच्या डोक्यात मारली. तसेच, अन्य आरोपींनी जमनीबाई यांना लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. मुकेश रक्तभंबाळ अवस्थेत पडल्याचे पाहून आरोपींनी तेथून पळ काढला.
यामध्ये मुकेश यांच्या डोक्याला आणि जमनीबाई यांच्या नाकाला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर वाकड येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपींची धरपकड सुरु केली आहे. पुढील तपास वाकड पोलीस करत आहेत.