बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

रामदास आठवले यांच्या हस्ते उद्या होणार पिंपरीतील भीमसृष्टीचे उद्घाटन

पिंपरी(वास्तव संघर्ष) पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात उभारण्यात आलेल्या भिमसृष्टीचे उदघाटन व माता रमाई पुतळयाच्या कामाचा शुभारंभ बुधवारी (दि. ११) क्रेंद्रीय सामाजिक न्याय तथा अधिकारीता राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती महापौर राहूल जाधव व सत्तारुढ पक्षनेता एकनाथ पवार यांनी दिली.या कार्यक्रमास विशेष अतिथी म्हणून मा. मंत्री महसूल व सार्वजनिक बांधकाम तथा पालकमंत्री, पुणे जिल्हा चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री, कामगार पर्यावरण, मदत व पुनवर्सन संजय तथा बाळा भेगडे, भन्ते डॉ. राहुल बोधी उपस्थित राहणार आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात भिमसृष्टी प्रकल्प उभारण्याचे काम मार्च २०१६ मध्ये सुरु करण्यात आलेले असून सदर प्रकल्पासाठी स्थापत्य, विद्युत, हॉर्टीकल्चर व १९ ब्रॉझचे म्युरल्स यासह सुमारे रक्कम रुपये ८ कोटी ५० लाख इतका खर्च आलेला आहे. सदर जागेचे क्षेत्रफळ २३६३ चौरस मिटर असून या जागेमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनावरील १२X ७ या आकाराचे १५ तर १६ X १२ या आकाराचे ४ ब्रॉझची म्युरल उभारण्यात आलेले आहे. या म्युरल प्रसंगाची माहिती ग्रेनाईट पाटीवर कोरुन लावण्यात आलेली आहेत.

मुख्य पुतळयासमोर आकर्षक कारंजे करण्यात आले असून त्यामध्ये ट्राय कलर दर्शविण्यासाठी ऊर्ध्वप्रकाश योजनेचा वापर केला असून पुतळा परिसरात आकर्षक लॅन्डस्केप व गार्डन विकसित केलेले आहे. तरी नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन महापौर राहूल जाधव यांनी केले

Share this: