क्राईम बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

गावठी कट्टा व जिवंत काडतुस जवळ बाळगणा-या सराईत गुन्हेगाराला सांगवी पोलिसांनी केले गजाआड

पिंपरी (वास्तव संघर्ष) :गावठी कट्टा आणि सहा जिवंत काडतुस जवळ बाळगणा-या एका सराईत गुन्हेगाराला सांगवी पोलिसांनी केले गजाआड आहे. सांगवी पोलिसांनी केलेल्या कारवाईत त्याच्याकडून दोन पिस्टल आणि सहा जिवंत काडतुसे जप्त केली. ही कारवाई सोमवारी (दि. 17) रात्री पिंपळे गुरव येथे करण्यात आली.

मंगेश सुरेश जाधव (वय 21, रा. ओटास्किम, निगडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंगनाथ उंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस नाईक चंद्रकांत भिसे, पोलीस शिपाई शशिकांत देवकांत, दीपक पिसे यांना सोमवारी रात्री माहिती मिळाली की, पिंपळे गुरव येथे नाशिक फाटा उड्डाणपुलाखाली नदीच्या बाजूला एक तरुण रात्री साडेअकरा वाजता गावठी कट्टा (पिस्टल) घेऊन येणार आहे.

त्यानुसार सांगवी पोलिसांचे एक पथक रात्री सव्वा अकरा वाजता उड्डाणपुलाखाली पोहोचले. पोलिसांनी परिसरात सापळा लावला.साडेअकरा वाजता एक तरुण उड्डाणपुलाजवळील एका पोलच्या उजेडाला येऊन थांबला. तो तरुण संशयितरीत्या फिरताना आढळल्याने पोलिसांनी शिताफीने त्याला ताब्यात घेतले.

उड्डाणपुलाखाली येण्याचे कारण विचारले असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. संशय बळावल्याने पोलिसांनी त्याची झडती घेतली.त्यात तरुणाकडे दोन पिस्टल आणि सहा जिवंत काडतुसे मिळाली. पिस्टल वापरण्याचा परवाना असल्याची खात्री केली असता त्याच्याकडे पिस्टल वापरण्याचा परवाना नसल्याचे निदर्शनास आले.

त्यावरून तरुणाला अटक करून त्याच्यावर भारतीय हत्यार कायदा कलम 3 (25) सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37 (1) सह 135 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस शिपाई शशिकांत देवकांत यांनी फिर्याद दिली आहे.

आरोपी मंगेश जाधव हा पोलीस रेकोर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर वाकड पोलीस ठाण्यात दरोड्याचा आणि निगडी पोलीस ठाण्यात मोबईल चोरीचा गुन्हा दाखल आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, विनायक ढाकणे, सहाय्यक आयुक्त श्रीधर जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंगनाथ उंडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अजय भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुळीग, पोलीस उप निरीक्षक यशवंत साळुंके, पोलीस कर्मचारी चंद्रकांत भिसे, रोहीदास बोन्हाडे, कैलास केंगले, सुरेश भोजणे, शशिकांत देवकांत, दिपक पिसे, विनायक देवकर, अरुण नरळे, नितीन खोपकर, अनिल देवकर, हेमंतकुमार गुत्तीकोंडा यांच्या पथकाने केली आहे

Share this: