बातम्या

पोलिसी अत्याचाराच्या विरुद्ध महाराष्ट्रदिनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयावर मोर्चा

पिंपरी(वास्तव संघर्ष) : कष्टकरी पंचायतीची नेते व आंबेडकरी चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते प्रल्हाद कांबळे व त्यांच्या पत्नी यांना पिंपरी पोलिसांनी केलेली मारहाण व दिलेल्या अपमानास्पद वागणूकी विरुद्ध त्यांनी आवाज उठवल्या बद्दल त्यांच्यावर शासकीय कामात अडथळा आल्याबाबत चा खोटा गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा दाखल केल्यानंतर जाणीवपूर्वक त्यांच्या हातामध्ये बेड्या घालून सुप्रीम कोर्ट व इतर न्यायालयांच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करून त्यांना पुन्हा पुन्हा अपमानित करण्याचा प्रकार पिंपरी पोलीस स्टेशन कडून सुरू आहे. दरम्यान सामाजिक व राजकीय कार्यकर्त्यावर 353 सारख्या गंभीर गुन्ह्याचा पोलिसांकडून सर्रासपणे खोटेपणातून वापर होणे हा चिंताजनक विषय असून या विरोधात पिंपरी-चिंचवड शहरातील कार्यरत असणाऱ्या कष्टकरी व आंबेडकरी चळवळीतील पक्ष संघटनांच्या कार्यकर्त्यांच्या वतीने महाराष्ट्र दिनी 1 मे रोजी सकाळी 11 वाजता चिंचवड येथील चाफेकर बंधू पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पोलीस आयुक्त कार्यालयापर्यंत निषेध मोर्चा काढण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

दिनांक 26 एप्रिल रोजी पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे रिक्षा स्टॅंडवर थांबण्याच्या वादातून वाहतूक पोलिसांनी विनाकारण केलेल्या वादातून रिक्षाचालक व रिक्षा संघटनेचे पदाधिकारी असणाऱ्या प्रल्हाद कांबळे यांना व त्यांच्या पत्नीला मारहाण केली याबाबत वरिष्ठांकडे तक्रार करून पुढील कायदेशीर कारवाई करतो असे म्हटल्यामुळे प्रल्हाद कांबळे यांच्याविरुद्ध सदर महिला पोलिसांनी व त्यांच्या सहकार्यांनी कट रचून विनयभंग व शासकीय कामात अडथळा सारखे अत्यंत गंभीर व खोटे गुन्हे दाखल केले आहेत. वास्तविक पाहता या मारहाणीमध्ये प्रल्हाद कांबळे यांच्या पत्नी जखमी झाल्या असून कांबळे यांना देखील मार लागलेला आहे. त्यांची तक्रार नोंदवून घेतात पण त्यांच्याविरुद्ध तक्रार नोंदवणे अन्यायकारक असल्याने याबाबत पोलिस आयुक्तांनी स्वतः तपास करून संबंधित खोटारड्या पोलिसांवर कारवाई करावी या मागणीसाठी सदर मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

सदर मोर्चामध्ये रिपब्लिकन युवा मोर्चा नेते राहुल डंबाळे ,रिपब्लिकन पार्टी अॉफ इंडिया शहर अध्यक्ष सुरेश निकाळजे , कष्टकरी कामगार पंचायत बळीराम काकडे , राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष संदिपान झोंबाडे, राष्ट्रीय चर्मकार महासंघ महासचिव ज्ञानेश्वर कांबळे ,बहुजन सम्राट सेना अध्यक्ष मा.संतोष निसर्गंध, मानवता हिताय सोशल फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष धनराजसिंग चौधरी, भिमाकोरेगांव संघर्ष समिती अध्यक्ष अनिताताई साळवे, सामाजिक कार्येकर्त्या अंजना गायकवाड, घरकाम महिला सभा अध्यक्ष शोभा शिंदे , साफ-सफाई महिला संघटना अध्यक्ष मा.सविता लोंढे , राष्ट्रवादी कॉग्रेस सफाई कामगार विभाग प्रदेश सचिव मा.युनूस पठाण , डॉ.बाबासाहेब आंबेडकर ग्रुप अध्यक्ष मा,सतीश कदम, भारतीय लहुजी पँथर पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष मा.अक्षय दुनघव, इ.सहभागी होणार आहेत .

Share this: