पिंपरी चिंचवडमधील झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या झोपडीधारकांनाही मिळणार तीन हजार रुपयांची मदत
पिंपरी (वास्तव संघर्ष) पिंपरी – चिंचवड शहरातील लोकसंख्या सुमारे पंचवीस ते सत्तावीस लाखापर्यंत गेली आहे. त्यातच पिंपरी चिंचवड शहरात एकूण 71झोपडपट्टया आहेत. त्यातील 37 घोषित आणि 34 अघोषित झोपडपट्या आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. हाताला काम नाही तर खिशात दाम नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. लॉकडाऊन कालावधीत शहरातील घोषित व अघोषित झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या झोपडीधारकांना तीन हजार रुपयांची मदत करण्याचा निर्णय पिंपरी चिंचवड पालिकेने घेतला आहे. याबाबतच्या उपसूचनेला महासभेने आज मान्यता दिली .त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या झोपडपट्टीतील गोरगरिबांना दिलासा मिळाला आहे.
याआधी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने शहरातील 18 हजार फेरीवाल्यांनाही मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेसाठी 15 मे पासून अर्ज भरता येणार असून महापालिकेच्या नागरी सुविधा केंद्रात अर्ज स्वीकृत केले जाणार आहेत .पिंपरी – चिंचवड महानगरपालिकेमार्फत लॉकडाऊन कालावधीत शहरातील परवानाधारक रिक्षाचालक , पथविक्रेते , घरेलु कामगार , बांधकाम मजूर , चर्मकार ( गटई कामगार ) , नाभिक , शालेय विद्यार्थी वाहतुक करणारे वाहन चालक , जिम ट्रेनर , लोक कलावंत आणि बँड पथक यांना तीन हजार रुपयांची मदत एकदाच दिली जाणार असून ही मदत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे .अशाच प्रकारची मदत झोपडपट्टीतील नागरिकांना देखील मिळणार आहे. मात्र त्यांना देखील 15 में पर्यंत वाट पहावी लागणार आहे.
दरम्यान, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने तीन हजारांची आर्थिक मदत झोपडपट्टीतील नागरिकांना मिळण्यासाठी कर भरल्याची पावती आणि कोरोना लसीकरणाचे पत्र जोडणे बंधनकारक करण्यात आले आहे.