बातम्यामहाराष्ट्र

जयसिद्धेश्वर स्वामी यांचा अनुसूचित जातीचा दाखला बनावट;सोलापुरात होणार पोटनिवडणूक

वास्तव संघर्ष आॅनलाईन -भारतीय जनता पार्टीचे खासदार डॉ . जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांचा बेडा जंगम जातीचा अनुसूचित जातीचा दाखला बनावट असल्याचा अहवाल सोलापूरच्या जात पडताळणी समितीने दिला आहे . याप्रकरणी समितीने खासदार डॉ . जयसिद्धेश्वर महास्वामी यांना नोटीस बजावली असून , येत्या शनिवारपर्यंत ता . १८ त्यांना म्हणणे मांडण्याची मुदत दिली आहे . या प्रक्रियेतून जातीचा दाखला बनावट असल्याचे अंतिमत : सिद्ध झाल्याने डॉ . जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांचे सदस्यत्व रद्द होवून लोकसभेची पोटनिवडणूक जाहीर होवू शकते . अनुसूचित जातीसाठी आरक्षित असलेल्या सोलापूर लोकसभा मतदारसंघातून २०१९ च्या निवडणुकीत खासदार डॉ . जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी हे भारतीय जनता पार्टी कडून विजयी झाले आहेत . खासदार महास्वामी यांच्या जात प्रमाणपत्रबद्दल प्रमोद गायकवाड , मिलिंद मुळे व विनायक कंदकुरे यांनी तक्रार केली होती . या तक्रारीनुसार जात पडताळणी समितीच्या अधिकाऱ्यांनी चौकशी करून अहवाल सादर केला आहे .

प्रमोद गायकवाड , मिलिंद मुळे व विनायक कंदकुरे यांनी नुरंदस्वामी गुरुबसय्या हिरमठ ऊर्फ खासदार डॉ . जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांचे जात प्रमाणपत्र बनावट असल्याची तक्रार करत याबाबतचे पुरावे ही दिले होते . या सखोल पुराव्याच्या आधारे समितीने चौकशी केली असता लिंगायत हा पंथ असून अनुसूचित जाती पैकी नाही . बेडा जंगम ही जात लिंगायत पंथ समूहातील नसून वेगळी असल्याचे निरीक्षण या अहवालात नोंदविण्यात आले . जानेवारी १९८२रोजी खासदार डॉ . महास्वामी यांनी काढलेल्या बेडा जंगम जातीच्या जात प्रमाणपत्राबाबत दक्षता समितीने सखोल चौकशी केली असता .

१९८२ मधील जात प्रमाणपत्र नोंदणीसाठी दोन रजिस्टर असल्याचे दिसून आले असून , जात प्रमाणपत्र नोंद असलेल्या रजिस्टरमधील नोंदीमध्ये , अक्षरबदल , शिक्का बदल व नोंदी अलीकडच्या काळातील असल्याचे चौकशी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले असल्याचा अभिप्राय अहवालात दिला आहे .त्यानुसार भाजप खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांचा अनुसूचित जातीचा दाखला बनावट ठरवला असून सोलापुरात पुन्हा निवडणूक लागून पोटनिवडणूक होणार आहे.

Share this: