बातम्यामहाराष्ट्रमाझं पिंपरी -चिंचवड

पिंपरीत विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी

पिंपरी (वास्तव संघर्ष) : महापालिकेच्या वतीने आयोजित क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार प्रबोधनपर्वाच्या चौथ्या दिवशी वीर बापूराव शेडमाके आदिवासी नृत्य पथक यांच्या वतीने आदिवासी कलानृत्यातून महामानवांना अनोखी मानवंदना देण्यात आली. यादरम्यान एकता कर्मचारी संघटनेच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पिंपरी येथील पूर्णाकृती पुतळ्यावर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करण्यात आली आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नावाचा जयघोष करण्यात आला.

विचार प्रबोधन पर्वाच्या चौथ्या दिवसाची सुरुवात मुंबई विद्यापिठाचे संगीत विभागप्रमुख प्रा. डॉ. कुणाल इंगळे यांच्या धम्मपहाट या कार्यक्रमाने झाली.  यामध्ये संजय उईके, स्नेहा चिमूरकर आणि सहकाऱ्यांचा सहभाग होता. या कार्यक्रमात गायकांनी आपल्या सुरेल आवाजाने प्रेक्षकांची मने जिंकली. त्यानंतर वंदना व समता सैनिक दलाच्या वतीने महामानवांना मानवंदना देण्यात आली.

 प्रबोधनकार तथा कव्वाल विनोद फुलमाळी यांचा स्मरण युगंधराचे हा प्रबोधनात्मक गीतगायनाच्या कार्यक्रमाचेही आयोजन यावेळी करण्यात आले होते. त्यानंतर संगीतमय अविष्कार.. गौरव भीमरायाचा या कार्यक्रमात विविध संगीत वाद्यातून आणि शिल्पकलेतून महामानवांना अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमात जयेंदू मातोश्री प्रोडक्शन यांनी विविध वाद्यांच्या माध्यमातून आणि शिल्पकार उत्तम साठे यांनी शिल्पकलेच्या माध्यमातून प्रेक्षकांची दाद मिळवली.

दुपारी सिनेपार्श्वगायक मुज्तबा अजीझ नाझा यांच्या कव्वालीच्या बहारदार कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात त्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान कार्याची आठवण कव्वालीच्या माध्यमातून प्रेक्षकांना करून दिली आणि त्यांची मने जिंकली.सायंकाळी सुप्रसिद्ध पंजाबी गायिका गिन्नी माही यांच्या गीतांची संगीतमय मैफिलीचे आयोजन करण्यात आले. यावेळी गिन्नी माही यांनी बाबसाहेबांचे कार्य व त्यांची शिकवण गीतांच्या माध्यमातून सादर केली आणि समानतेचा संदेश दिला.

त्यानंतर सिनेपार्श्वगायक तसेच बिग बॉस फेम डॉ. उत्कर्ष शिंदे यांचा भिमगीतांचा लाईव्ह कॉन्सर्ट – शिंदेशाही हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात डॉ. उत्कर्ष शिंदे यांनी आपल्या दमदार आवाजात भीमगीते सादर करून प्रेक्षकांना तालावर नाचायला भाग पाडले.

रात्री गायक, संगीतकार, सिनेकलाकार नंदेश उमप यांच्या महामानवांच्या गीतांचा महाजलसा या कार्यक्रमाने चौथ्या दिवसाची सांगता झाली. यावेळी नंदेश उमप यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना संगीतमय मानवंदना दिली. या कार्यक्रमास हजारोंच्या संख्येने नागरिकांनी उपस्थिती दर्शवली.

विचार प्रबोधन पर्वाच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच सोमवार, दि. १५ एप्रिल २०२४ रोजी सकाळी १० वाजता स्थानिक कलाकार महामानवांच्या विचारांचा संगीतमय जागर हा कार्यक्रम सादर करणार आहेत. त्यानंतर सकाळी ११.३० वाजता महापालिका स्पर्धा परीक्षा केंद्रातील विविध स्पर्धा परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. दुपारी ११.४५ वाजता सुमेध कल्हाळीकर यांच्या महापुरुषांच्या परिवर्तनवादी गीतांचा कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात अनिरुद्ध सूर्यवंशी, वैशाली नगराळे, सुनील गायकवाड यांचा सहभाग असणार आहे. दुपारी १.१५ वाजता आंबेडकरी गीतांची प्रबोधनात्मक मैफिल आयोजित करण्यात आली आहे. या मैफिलमध्ये रोमिओ कांबळे, मुन्ना भालेराव, सागर येल्लाळे, संगीता भंडारे या कलाकारांचा सहभाग असणार आहे. त्यानंतर दुपारी २.४५ वाजता सुधाकर वारभुवन, मारूती जकाते, सुमन चोपडे, सत्यभामा मस्के यांच्या गीतगायनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी ४.१५ वाजता गायक विशाल ओव्हाळ, धीरज वानखेडे, छाया कोकाटे, मिलिंद शिंदे यांचा महामानवांच्या जीवनावर आधारित प्रबोधनपर गीतांचा कार्यक्रम सादर होणार आहे.

सायंकाळी ६ वाजता एच.ए.मैदान, पिंपरी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित १५० कलावंताचा सहभाग असलेले, राष्ट्रीय पातळीवर गाजलेले, तीन मजली अतिभव्य मंच असलेले, दिग्गज कलाकारांचा सहभाग असलेले तसेच रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविलेले जतिन पाटील दिग्दर्शित काळजाचा ठाव घेणारी अप्रतिम कलाकृती – मूकनायक या महानाट्याने प्रबोधन पर्वाची सांगता होणार आहे

Share this: