बातम्यामहाराष्ट्र

संभाजी ब्रिगेड लढणार पुण्यातील सर्व  लोकसभा निवडणुका

पुणे  दि.८ : संभाजी ब्रिगेडने पुण्यातील सर्व  लोकसभा निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची माहिती संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी दिली आहे. यासंदर्भात आज पुणे येथे पत्रकार परिषद झाली. यावेळी पुणे विभागीय अध्यक्ष शिवश्री. मा. किरणराज घाडगे व जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केले.

देशातील नरेंद्र मोदी सरकार सपशेल अपयशी ठरले असल्याची टीका संतोष शिंदे यांनी केली आहे. तसेच हे सरकार निष्क्रिय ठरले आहे. विरोधकांचे हात भ्रष्टाचार व घोटाळ्यात दगडाखाली अडकल्यामुळे सरकारच्या विरोधात बोलायला हतबल आहेत. त्यामुळे नागरिकांच्या हक्कासाठी बोलायला व सभागृहात भांडायला कोणीही उरले नाही. संभाजी ब्रिगेड ती जागा भरून काढणार असुन प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या कष्टाच्या जोरावर पुण्यातील सर्व लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं संतोष शिंदे यांनी म्हटले आहे.

तसेच राजकारणात चांगल्या कामातून संभाजी ब्रिगेड स्वतःची ‘स्पेस’ निर्माण करणार आहे. शेतकरी प्रश्न, दारूबंदी, तरुणांना रोजगार, महागाई, झोपडपट्टी विरहित शहर, पाणी प्रश्न चांगले रस्ते व वाहतूक सेवा, धर्मनिरपेक्ष समाज. आदी मुलभूत प्रश्नांवर संभाजी ब्रिगेड भर देणार असल्याचेही संतोष शिंदे यांनी म्हटले आहे.

राज्यातील ३० लोकसभा व १०० विधानसभा निवडणूक संभाजी ब्रिगेड लढवणार आहे. लोकसभा व विधानसभेच्या जागेवर महिलांना 50 टक्के जागा देऊन महिलांना जास्तीत जास्त संधी देणार आहे. ‘दारू मुक्त गाव व शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव’ आणि १००% समाजकारण व १००% राजकारण…’ हे ब्रिद घेऊन संभाजी ब्रिगेड शेतकरी व तरुनांच्या मूलभूत प्रश्नावर रणांगणात उतरणार असल्याचं मत संभाजी ब्रिगेड’चे पुणे विभागीय अध्यक्ष किरण घाडगे यांनी व्यक्त केले.

पत्रकार परिषदेला पुणे विभागीय अध्यक्ष   किरणराज घाडगे, संभाजी ब्रिगेड’चे पुणे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे, शहराध्यक्ष प्रशांत धुमाळ, मराठा सेवा संघाचे सचिन आडकर, हवेली तालुकाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे, कार्याध्यक्ष शिवाजी पवार, चित्रपट आघाडी अध्यक्ष प्रकाश धिंडले, शहर संघटक विवेक तुपे, संजय चव्हाण, मारूती चव्हाण, आदी उपस्थित होते

Share this: