आपल्याच देशात परके झाल्यासारखे वाटते – संभाजी भिडे
जालना : शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांची सभा उधळून लावण्याचे दलित संघटनांनी जाहीर केल्यामुळे प्रचंड पोलीस बंदोबस्तात सभा पार पडली. शहरातील उत्सव मंगल कार्यालयात संभाजी भिडे यांची सभा पोलिस बंदोबस्तात पार पडली.
दलित संघटनांनी भिडे यांची सभा उधळून लावण्याची घोषणा केली होती. पोलिसांनी रिपब्लिकन पक्षाचे भीमराज बागुल, रितेश एडके, मोहन आव्हाड, विशाल सुरडकर, किरण साळवी, सचिन ब्राह्मणे, भगवान रोकडे आदिंसह सोळा कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले. सभेकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर पोलिसांनी तपासणी नाके उभारले होते. शहरात बंदोबस्त मोठय़ा प्रमाणावर ठेवण्यात आला होता. पोलिसांमुळे कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही.
याावेळी भिडे म्हणाले की, आम्ही आपल्याच देशात परके झाल्यासारखे वाटत असून हिंदू बांधव आजही नादान म्हणून वागत आहेत.
भिडे पुढे म्हणाले पंडित नेहरूंनी यशवंतराव चव्हाण या मराठी माणसाला संरक्षण मंत्री केले होते. पूर्वी त्यागी लोक होते. आता तसे नाही. चव्हाणांनी फक्त राजकारण केले नाही. त्यांनी लिहिलेले ‘सह्याद्रीचे वारे’ हे पुस्तक वाचावे असा सल्लाही तरूणांना दिला. माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय आर.आर. पाटील एकदा म्हणाले होते, आज हिंदुस्थान एकत्र आहे त्याचे कारण भारतीय सैन्य होय. ते काही वावगे ठरणार नाही. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा धागा आज हिंदूना एकरुप करणारा धागा आहे.
छत्रपतींनी २८९ मृत्यूला झुंज देणाऱ्या लढाया केल्या. छत्रपतींचं शरीर लहान होत, मात्र त्यांचे कार्य थोर होते. राजगड ते रायगड मोहिमेत सहभागी व्हा. शिवरायांचे पुजारी व्हा, असे आवाहन भिडे यांनी तरुणांना केले.