पिंपरी-चिंचवडमध्ये “सावरकर” चित्रपटाचा एकही शो होऊ देणार नाही
पिंपरी (वास्तव संघर्ष): विनायक दामोदर सावरकर यांच्या जिवनावर आधारित अभिनेता रणदिप हुड्डा याच्या प्रमुख भूमिकेतील “सावरकर” हा चित्रपट येत्या 22 मार्च पासून प्रदर्शित होणार आहे.या चित्रपटावर आक्षेप घेत पिंपरी चिंचवड शहरातील एकाही सिनेमागृहात शो होऊ देणार नसून चित्रपट बंद पाडु असे लढा युथ मूव्हमेंट अध्यक्ष प्रमोद क्षिरसागर यांनी सेन्सॉर बोर्डाशी केलेल्या पत्रव्यवहारात म्हटले आहे.
“सावरकर” या चित्रपटात महामानव विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अभिनयासाठी निवडलेल्या कलाकारावरून फक्त सोशल मीडियातुनच नव्हे तर देशातील लोकशाही तथा संविधान मानणार्या मोठ्या वर्गाकडून निषेध व्यक्त केला जात आहे. सदर चित्रपटात बाबासाहेबांचा चेहरा त्यांच्या व्यक्तिमत्वाला साजेसा नाही. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे खरे फोटो उपलब्ध असून ते इंग्रजांच्याही राहणीमानाला लाजवेल असा त्यांचा पेहराव होता.
चेहर्यावर प्रखर तेज होते. मात्र चित्रपटात ऐतिहासिक पात्र निवडताना काहीतरी साधर्म्य असायला हवे की नको? का एकाला हिरो दाखवण्यासाठी महामानवाचे विकृतीकरण करण्याचा डाव सावरकर चित्रपटाचे दिग्दर्शक, निर्माता व त्यांच्या संपूर्ण टीम ने आखला आहे का? असा प्रश्नही पत्रात केला आहे. तात्काळ या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डकडून मान्यता नाकारण्यात यावी.बाबासाहेबांच्या भूमिकेतील केलेले संपुर्ण चित्रिकरण कट करुन दिग्दर्शक, निर्माता, अभिनेत्यासह संबंधित संपूर्ण टीम वर भावना दुखावल्या प्रकरणी कायदेशीर करण्यात यावी अन्यथा आंदोलनात्मक भूमिका घेऊ असा इशारा प्रमोद क्षिरसागर,सुरेश बोचकुरे, बुद्धभुषण अहिरे यांनी दिला आहे.