बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

पिंपरीतील मिलिंदनगर पुनर्वसनातील रहिवाशांना महापौर माई ढोरे यांच्या हस्ते घरांची चावी सुपुर्द

पिंपरी(वास्तव संघर्ष) :आपले स्वत:चे घर असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते आणि आज महानगरपालिकेच्या माध्यमातून हे स्वप्न साकार होत आहे याचा खूप आनंद होत आहे असे प्रतिपादन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने मिलिंदनगर, पिंपरी येथील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातील इमारत क्र. ए २ मधील पाच सदनिकांचे प्रातिनिधीक स्वरूपात हस्तांतरण महापौर माई ढोरे यांच्या हस्ते पार पडले त्यावेळी त्या बोलत होत्या.

या वेळी उपमहापौर नानी उर्फ हिराबाई घुले, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, नगरसदस्य संदिप वाघेरे, नगरसदस्या उषा वाघेरे, निकिता कदम, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, कार्यकारी अभियंता शिरिष पोरेड्डी, उपअभियंता अनघा पाठक, माहिती व जनता संपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक आदी उपस्थित होते.

महापौर माई ढोरे म्हणाल्या झोपडपट्टी पुनर्वसनाचे काम प्रगतीपथावर असून लवकरच अन्य लाभार्थींना सदनिकांचे वाटप करण्यात येणार असून लाभार्थ्यांनी त्यांना मिळालेल्या घराचा वापर स्वत: करावा आणि घराचा आनंद घ्यावा असे सांगून त्यांनी लाभार्थ्यांना आणि संपुर्ण शहरवासियांना बुद्धपौर्णिमेनिमित्त शुभेच्छा दिल्या. सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

जे.एन.एन.यु.आर.एम. आणि बी.एस.यु.पी. अंतर्गत महानगरपालिकेच्या वतीने मिलिंदनगर, पिंपरी येथे ५ इमारती बांधण्यात आल्या होत्या. त्यातील २ इमारतीमधील सदनिकांचे हस्तांतरण आज सुरु झाले. कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर मोठा कार्यक्रम टाळून प्रातिनिधिक स्वरूपात शेखर महाडीक, अशोक राजपूत, चॉंद खान, कासिमबी पठाण आणि सुनंदा साबळे या पाच जणांना सदनिका हस्तांतरण करण्यात आल्या.

सदर दोन इमारतींमध्ये प्रत्येकी ११२ सदनिका आहेत. इमारतीमध्ये जिन्याबरोबरच लिफ्टचीही व्यवस्था आहे. २७० चौरस फुटाच्या चटई क्षेत्राच्या सदनिकांमध्ये हॉल, किचन आणि संडास बाथरुम यांचा समावेश आहे. सात मजली इमारतीच्या तळ मजल्यावर वाहनतळ करण्यात आलेला आहे.कार्यक्रमाचे प्रास्तविक सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांनी केले तर सुत्रसंचालन व आभार माहिती व जनता संपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक यांनी मानले

Share this: