क्राईम बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

पिंपरी चिंचवडमधील ‘रावण साम्राज्य’ या टोळीचे नाव कसे पडले ;वाचा गुन्हेगारी टोळ्यांची वास्तव कहानी

(लेखक- दिपक साबळे…..) – : पिंपरी चिंचवडमध्ये गुन्हेगारी जगतात आपले नाव कमावण्यासाठी धडपड करणाऱ्या काही कुप्रसिद्ध टोळ्या या आपले अस्तित्व अधूनमधून दाखवत असतात.शहरात टोळक्याने केला तुफान राडा, त्या टोळीतील मुख्य आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या, टोळीने परिसरात दहशत निर्माण करुन केली मारहाण , वर्चस्व वादातून एका टोळीतील सदस्यांवर गोळीबार, सोशलमिडीयावर तलवार घेऊन स्टेट्स टाकणा-या भाईला पोलिसांनी केली अटक अशा प्रकारच्या अनेक बातम्या नेहमी कानावर पडत असतात. आपली दहशत कायम ठेवण्यासाठी टोळक्‍यांकडून वारंवार गंभीर गुन्हे करून टोळी निर्माण केली जाते. टोळीचा दबदबा निर्माण झाल्यानंतर एखाद्या नावाने टोळी चालविली जाते. टोळीच्या म्होरक्‍याच्या नावाने किंवा एखाद्या चित्रपटातील प्रसंगावरून टोळीला नाव पडते. आणि मग टोळीच्या नावाचे रितसर बारसे केले जाते.

अनेक गुन्हेगार बालवयातच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांच्या सानिध्यात येऊन अट्टल गुन्हेगार बनतात. शिक्षण घेण्याच्या वयात कुठेतरी छोटी-मोठी चोरी किंवा हुल्लडबाजी करत भाई-दादा होण्याचे स्वप्न ते पहात असतात. खून, मारामारी , वाहनांची तोडफोड, दमदाटी, रॅश ड्रायव्हिंग करीत परिसरात दहशत निर्माण करून काही युवक वेगळ्या मार्गाने चमकायला पाहतात. त्यानंतर एक-दोन गुन्हे केल्यावर जेलची हवा खाल्ल्यानंतर जेलमध्येच अनेक गुन्हेगारी टोळ्यांची जेलच्या बराकमध्ये दहशत पाहून गुन्हेगारीचे आकर्षण असणारी मुले जेललाच आपले ‘विद्यापीठ’ ठरवतात. संगनमताने गुन्हे केल्यानंतर तो टोळीचा सदस्य बनतो. पिंपरी-चिंचवडमधील विविध भागात अनेक गुन्हेगारी टोळ्या होत्या व अद्यापही आहेत. या टोळ्यांनी खून, खुनाचा प्रयत्न, वाहनांची तोडफोड करण्यासह अनेकदा राडा घालत सार्वजनिक शांततेचा भंग केला आहे.

आकुर्डी परिसरातील सोन्या काळभोर टोळी , रावण साम्राज्य टोळी , बॉबी यादव टोळी , आक्‍या बॉन्ड टोळी तर भोसरी परिसरात गोट्या धावडे, देहूरोड परिसरात महाकाली टोळी, हस्तोडिया टोळी, पवार टोळी, वाकडमधील चौधरी टोळी आणि चिंचवडमधील मामा गॅंग या टोळ्या नेहमीच चर्चेत असतात. या टोळ्यांनी अनेकदा पिंपरी-चिंचवडसह परिसरात धूडगूस घातला आहे . या टोळीच्या म्होरक्‍यासह त्यातील सदस्यांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. टोळ्यांचा बिमोड करण्यासाठी पोलिसांनी यातील गुन्हेगारांना तडीपार करण्यासह मोक्काचीही कारवाई केली. यामुळे काही टोळ्यांचा उपद्रव कमी झाला.

टोळ्यांची नावे त्यातील म्होरक्‍यांच्या नावावरूनच पडलेली आहे. देहूरोड परिसरातील महाकाली टोळीने 2002 ते 2010 या कालावधीत देहूरोड परिसरात अक्षरश: धुमाकूळ घातला होता. मात्र, डिसेंबर 2011 मध्ये आकुर्डीतील रमाबाईनगर परिसरात पुणे ग्रामीण पोलिसांनी या टोळीचा म्होरक्‍या महाकाली उर्फ राकेश ढकोलिया याचा एन्काऊंटर केला. त्यानंतर ही टोळी त्याचा भाऊ मनोज उर्फ डिंगऱ्या ढकोलिया चालवीत होता. मात्र, त्याचाही 17 मे 2020 रोजी पुनावळे येथील लंडन ब्रिजखाली खून झाला . गोट्या धावडे टोळीनेही भोसरी परिसरात दहशत निर्माण केली होती. या टोळीचा म्होरक्‍या असलेल्या सचिन उर्फ गोट्या धावडे याने भाजपच्या एका बड्या नेत्याचा खून केला. यामुळे भोसरीत अनेक दिवस तणावपूर्ण वातावरण होते. दरम्यान, गोट्या धावडे याचाही डिसेंबर 2012 मध्ये खून झाला. त्यानंतर ही टोळीही विस्कटली. आकुर्डीतील सोन्या काळभोर टोळीनेही निगडी, आकुर्डीसह परिसरात मोठ्याप्रमाणात उपद्रव केला. या टोळीचा म्होरक्‍या सोन्या काळभोर असून काही दिवसांच्या अंतराने या टोळीचा काही ना काही उद्योग सुरूच असतो. तसेच आक्‍या बॉन्ड टोळीनेही चिखली घरकुल परीसरात उच्छाद मांडला आहे. आक्‍या बॉण्ड टोळीतील सराईत गुन्हेगार दहशत माजविण्याच्या उद्देशाने परिसरातील वाहनांची तोडफोड करत आपले अस्तित्व दाखविण्याचा प्रयत्न करतात.

अनेक गुन्हेगारी टोळ्या या सोशलमिडीयावर आपले अस्तित्व दाखविण्याचा प्रयत्न करत असते. चित्रपटात दाखविल्याप्रमाणे काही जणांना एकत्र घेऊन टोळी तयार करून गुंडगिरी केली जाते. चित्रपटांच्या गाण्यांच्या आधारावर टोळीतील सदस्यांची गाणी, व्हिडिओ तयार करून समोरील टोळीवर वर्चस्व दाखविण्यासह आपले अस्तित्व दाखविण्याचा प्रयत्न केला जातो. सोशलमिडीयावर समोरच्या टोळीला धमकी दिली जाते. सध्या सोशलमिडीयावर रावण साम्राज्य टोळीतील सदस्य आपले अस्तित्व दाखवत आहेत. गेल्याच आठवडय़ात हातात तलवार घेऊन स्टेट्स टाकणा-या रावण टोळीच्या सदस्याला पोलिसांनी अटक केली होती.आकुर्डी परिसरातील अनिकेत जाधव हा आरोपी पुण्यातील येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत असताना त्याने रावणावर आधारित पुस्तक संपुर्ण वाचले त्यानंतर रावणाचा प्रभाव त्याच्यावर पडला . त्यामुळे रावण नाव त्याच्या डोक्यात बसले. वारंवार रावणाची चर्चा होऊ लागली यातूनच त्यांच्या टोळीला ‘रावण साम्राज्य’ नाव दिले गेले. रावण साम्राज्य टोळीतील म्होरक्‍या अनिकेत जाधव याचा 20 नोव्हेंबर 2017 रोजी खून करण्यात आला होता माञ आजही रावण साम्राज्य टोळी त्याचे अस्तित्व अधूनमधून दाखवून देत असते.पुण्यात जशा गुन्हेगारी टोळ्या आहेत तशाच पिंपरी चिंचवड शहरात 30 ते 35 गुन्हेगारी टोळ्या आहेत. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश या सा-या टोळीवर कशी कारवाई करतील हे पहावे लागेल..!

टोळीचे नाव – टोळी प्रमुख – पोलिस ठाणे
1) भरणे टोळी – राकेश भरणे – हिंजवडी
2) रावण साम्राज्य – अनिकेत अरुण जाधव – निगडी
3) काळभोर टोळी – सोन्या उर्फ विवेक काळभोर – निगडी
4) महाकाली टोळी – राकेश ढोलकीया – देहोरोड
5) दाभाडे टोळी – शाम रामचंद्र दाभाडे – तळेगाव दाभाडे
6) हस्तोडिया टोळी – अरुण मुकेश हस्तोडिया – देहूरोड
7) राठोड टोळी – देवानंद राठोड – आळंदी
8) तांगडे टोळी – गणेश शंकर तांगडे – तळेगाव एमआयडीसी
9) शिंदे टोळी – हनुमंत भगवान शिंदे – देहूरोड
10) टकले टोळी – मयूर उर्फ बंटी टकले – तळेगाव दाभाडे
11) धनवे टोळी – अविनाश बाळू धनवे – दिघी
12) पवार टोळी – प्रशांत उर्फ शिंगरू पवार – देहूरोड
13) अलकुंडे टोळी – राहुल उत्तम अलकुंडे – देहूरोड
14) गुजर टोळी – संतोष कांतीलाल गुजर – चाकण
15) खान टोळी – शाहरुख युनूस खान – वाकड
16) पांडे टोळी – बाबा पांडे- भोसरी
17) डोंगरे टोळी – महेश किरण डोंगरे – भोसरी
18) धरम्या टोळी – धर्मेश शामकांत पाटील – पिंपरी
19) मामा गॅंग – आकाश उत्तम रणदिवे – चिंचवड
20) सांडभोर टोळी – प्रमोद सोपान सांडभोर – तळेगाव दाभाडे
21) मुऱ्हे टोळी – योगराज उर्फ बिट्या बाळासाहेब मुऱ्हे – तळेगाव दाभाडे
22) शेख टोळी – साबीर समीर शेख – देहूरोड
23) बुग्गी टोळी – बुग्गी उर्फ मोबीन सलीम शेख – देहूरोड
24) लांडगे टोळी – ज्ञानेश्वर रामदास लांडगे- एमआयडीसी भोसरी
25) गोल्डन ग्रुप – साहिल उर्फ खाऱ्या तानाजी जगताप- निगडी
26) बीवाय टोळी – बॉबी उर्फ सुरेश विलास यादव – निगडी
27) गवळी गॅंग – आनंद उर्फ दाद्या राजू गवळी – निगडी
28) कोरबू टोळी – मोहम्मद उर्फ मम्या मेहबूब कोरबू – निगडी
29) गाढवे टोळी – अवधूत जालिंदर गाढवे – दिघी
30) नाणेकर टोळी – बाबुशा उर्फ बाबाजी ज्ञानेश्वर नाणेकर – चाकण
31) सोप्या गॅंग – स्वप्नील उर्फ सोप्या संजय शिंदे – चाकण
32) हिंगे टोळी – लक्ष्मण उर्फ दाद्या पिराप्पा हिंगे – वाकड
33) चौधरी टोळी – अनिकेत अर्जुन चौधरी – वाकड

Share this: