बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

शिवसेनेचा बेडुक कितीही फुगला तरी बैल होत नाही ;आशिष शेलार यांचा संजय राऊतांना टोला

पिंपरी (वास्तव संघर्ष ): आगामी निवडणुकीत शिवसेनेचे पन्नास उमेदवार नगरसेवक म्हणून निवडून येतील तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत शिवसेनेचाच महापौर होणार अशी शिवगर्जना खासदार संजय राऊत यांनी पिंपरी चिंचवडमध्ये केली होती यावर आज माजी मंत्री व भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी खरमरीत टोला लगावला आहे.

ते म्हणाले ‘राज्यात सर्वसामान्य जनतेला भेडसावणा-या समस्या सोडविण्याऐवजी महाविकास आघाडीच्या सरकार मधिल घटक पक्ष स्वबळाची भाषा करण्यात मश्गुल आहेत. एक स्वबळाची भाषा करतो, दुसरा अग्रलेख लिहीतो, तीसरा दिल्लीत जातो. जनतेच्या प्रश्नांची यांना काळजी नाही. रोज उठायचे नि सरकार पाच वर्षे टिकणार याचा मंत्र जप करायचा. पिंपरी चिंचवड पालिकेत शिवसेनेच्या महापौरांची स्वप्न बघणा-या संजय राऊत यांनी शिवसेनेचा बेडुक कितीही फुगला तरी तो बैल होणार नाही हे लक्षात ठेवावं

पिंपरी चिंचवड भाजपाच्या वतीने बुधवारी (दि. 21 जुलै) पिंपरीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत शेलार बोलत होते. यावेळी भाजपा शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे, महापौर माई ढोरे, माजी खासदार अमर साबळे, भाजपा महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा उमा खापरे, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, भाजपा दक्षिण भारत आघाडी प्रदेशाध्यक्ष राजेश पिल्ले, संघटन सरचिटणीस अमोल थोरात, बाबू नायर, ॲड. मोरेश्वर शेडगे, राजू दुर्गे, पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे आदी उपस्थित होते.

महाविकास आघाडीवर टिका करताना शेलार म्हणाले की, राज्यातील शेतक-यांना बोगस बियाने दिली. कर्ज मुक्ती, पीकविमा, वादळामुळे झालेले नुकसान भरपाई, महिला अत्याचार, सायबर क्राईम याकडे दुर्लक्ष केले जात आहे. सरकार पोलिसांकडून वसूलीचे काम करत आहे. बारा बलूतेदार, अलुतेदार यांना मदत दिली नाही. ओबीसी आरक्षण, मराठा आरक्षण टिकविता आले नाही अशा निष्क्रिय सरकारचा बुरखा फाडणार आहोत असे शेलार म्हणाले. शिवसेनेच्या लोकांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. शिवसेनेचे ब्लॅकमेलिंगचे धंदे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये आता चालणार नाहीत. ओबीसींचे राजकीय आरक्षण टिकविण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने कायद्याने जे करायला होते ते केले नाही. इंपिरीकल डाटा ठाकरे सरकारने का दिला नाही. मागासवर्गीय आयोग स्थापन करण्यासाठी पंधरा महिने उशीर का झाला ? जर वेळेत आयोग स्थापन केला असता तर न्यायालयाने आरक्षण स्थगित केले नसते. मराठा आरक्षणाबाबत नविन सरकारने बाजू नीट मांडली नाही. त्यामुळे न्यायालयात आरक्षण टिकले नाही. जाती – जातींमध्ये भांडणे लावण्याचा तर मानस नाही ना ? असाही प्रश्न माजी मंत्री व भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी यावेळी उपस्थित केला.

Share this: