‘त्या’ खूनातील आरोपींना अटक केली म्हणुन आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पोलिसांना दिले 40 हजारांचे बक्षीस
पिंपरी (वास्तव संघर्ष) : पुण्यातील येरवडा उर्दू शाळेजवळ 14 जुलै 2021 रोजी एक वयोवृद्ध महिला रहस्यमयरित्या गायब झाली असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली होती. त्या रहस्यमयरित्या गायब झालेल्या वयोवृद्ध महिलेचा खून झाल्याचे निश्पन्न झाले. या खुनाचा आरोपी सराईत गुन्हेगार असलेल्या आरोपीला आणि त्यांच्या मावशीला पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट दोनच्या पोलिसांनी अटक केली आहे. खून केल्यानंतर सासूचा मृतदेह साडी व चादरीमध्ये बांधून देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुणे – मुंबई महामार्गाच्या झाडा झुडपांच्या आडोशाला फेकून दिले .
सरोजाबाई दासा जोगदंड ( वय 70 , रा.येरवडा पुणे ) असे खून झालेल्या सासूचे नाव आहे .
इम्तियाज ऊर्फ चिंट्या मुस्ताक शेख ( वय २५ , रा . ओटास्किम , निगडी ) असे अटक केलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे तर मुन्नी गेना जोगदंड असे आरोपी मावशीचे नाव आहे .
पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार , आरोपी मुन्नी हिने मृत सासूच्या मुलासोबत आंतरजातीय विवाह केला होता . तिच्या पतीचा मागील काही महिन्यांपूर्वी मृत्यू झाला आहे . त्यानंतर सासू आरोपी सुनेला त्रास देत होती . मयताने पाच एकर जमीन विकली असून त्यातून तिला खूप पैसे मिळाले असल्याचे सुनेला समजले होते . चिंट्या याच्यावर दोन खुनाचे गुन्हे दाखल आहेत . त्यातील एका खुनाच्या गुन्ह्यात जामीन मिळाला असून दुसऱ्या खुनाच्या गुन्ह्यात तो पॅरोलवर बाहेर आला होता . चिंट्या कारागृहातून बाहेर आल्यानंतर मुन्नीने चिंट्याला सांगितले की , सासू खूप त्रास देत असून तिला मारण्यासाठी तू येरवड्याला ये ‘ . त्यानुसार चिंट्याने निगडीमधून एक रिक्षा चोरली आणि मावशी मुन्नीकडे गेला . दोघांनी मिळून मुन्नीच्या सासूला ठार मारले . त्यानंतर तिचा मृतदेह रिक्षात घालून तिला जुना पुणे मुंबई महामार्गाच्या बाजूला देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत फेकले .
सुरुवातीला सरोजाबाई यांच्या मिसिंगची तक्रार त्यांच्या मुलगी लतिका वसंत गायकवाड यांनी येरवडा पोलीस ठाण्यात दिली . दरम्यान , पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट दोनच्या पोलिसांना माहिती मिळाली की , चिंट्या याने सरोजाबाई यांचा खून केला असून तो निगडीतील ओटास्किम परिसरात आहे . त्यानुसार पोलिसांनी चिंट्याला अटक केली . त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने आणि त्याच्या मुन्नी मावशीने मिळून हा खून केल्याचे कबूल केले . आरोपी चिंट्याला देहूरोड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे . पोलिसांनी चिंट्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे . गुन्हे शाखा युनिट दोनच्या टीमला पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी 40 हजारांचे बक्षीस जाहीर केले आहे .
ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश , अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे , पोलीस उपआयुक्त ( गुन्हे ) सुधीर हिरेमठ , सहाय्यक पोलीस आयुक्त ( गुन्हे ) प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड , पोलीस अंमलदार जमीर तांबोळी , प्रमोद येताळ , विपुल जाधव , जयवंत राऊत , नामदेव राऊत , दिलीप चौधरी , केराप्पा माने , शिवानंद स्वामी , अजित सानप यांच्या पथकाने केली आहे .