बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

पिंपरी चिंचवड मधील भाजपा म्हणजे ‘जुनी दारु नविन बाटली’ ;वंचित बहुजन आघाडीचा हल्लाबोल

पिंपरी(वास्तव संघर्ष ) कामगार कंत्राट पध्दती संविधानाच्या विरोधी आहे. देशामध्ये 1991 पासून कॉंग्रेसने खासगीकरण सुरु केले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली वेगाने सर्वच क्षेत्रात खासगीकरण सुरु आहे. त्यांचेच भाजपाचे आमदार, नगरसेवक पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतही संविधान विरोधी जाऊन आरोग्य क्षेत्रातही कामगारांचे कंत्राटीकरण करीत आहे. आरक्षणाच्या तरतूदीची पायबंदी म्हणजेच खासगीकरण, कंत्राटीकरण हे वंचित बहुजन आघाडी कदापीही होऊ देणार नाही असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष सर्वजीत बनसोडे यांनी केले.

पिंपरी चिंचवड शहर वंचित बहुजन आघाडीची गुरुवारी (दि. 16 सप्टेंबर) पिंपरी येथे पत्रकार परिषद आयोजित केली होती. या पत्रकार परिषदेत बनसोडे बोलत होते. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल जाधव, शहराध्यक्ष देवेंद्र तायडे. शहर कार्याध्यक्ष अंकु‌श कानडी, संजीवन कांबळे, शहर महिला आघाडीच्या अध्यक्षा लताताई रोकडे, शहर महिला आघाडीच्या महासचिव सुनिता शिंदे, शहर महासचिव संतोष जोगदंड, राहुल सोनवणे, शहर प्रवक्ते के. डी. वाघमारे, भोसरी विधानसभा अध्यक्ष अनिल भारती आदी उपस्थित होते.

यावेळी सर्वजित बनसोडे म्हणाले की, आरोग्य विभाग हा काय सरकारच्या उत्पन्नाचा भाग आहे काय ? वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील वाड्यावस्त्यांवरील, झोपडपट्टीतील गोरगरीब नागरीकांना आरोग्य सुविधा मिळवून देण्यासाठी आम्ही वेळप्रसंगी रस्त्यावर उतरु. पिंपरी चिंचवड शहरातील आरोग्य, वैद्यकीय विभागाचे कंत्राटीकरणाचा ठराव भाजपा आणते आणि राष्ट्रवादी त्याला पाठींबा देते हा काय प्रकार आहे? वायसीएमसह शहरातील इतर नऊ रुग्णालयांचे खासगीकरण करण्याचा भाजपच्या आमदारांचा आणि पदाधिका-यांचा घाट आहे. त्यांचा आम्ही पर्दाफाश करणार आहोत. 7112 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प असणा-या या महापालिकेत फक्त 208 कोटी रुपये आरोग्यावर खर्च केले जातात. महानगरपालिकेने आरोग्य, वैद्यकिय विभागाची श्वेतपत्रिका जाहीर करावी अशीही मागणी बनसोडे यांनी केली.

यावेळी प्रदेश उपाध्यक्ष अनिल जाधव म्हणाले की, पिंपरी चिंचवड मधिल भाजपा म्हणजे जुनी दारु आणि नविन बाटली आहे. भाजपाचे पदाधिकारी दिवसाढवळ्या मनपाच्या तिजोरीवर दरोडा घालतात आणि राष्ट्रवादीचे त्याला साथ देतात. गावकी भावकी एकत्र येऊन ठेकेदारी वाटून घेत आहेत. कोरोनाचे संकट म्हणजे यांना दिवाळीची संधी मिळाल्यासारखे होते. देशाच्या एकूण जीडीपीच्या दहा टक्के म्हणजे वीस लाख कोटी रुपये कोरोनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहेत. या कोरोना काळात खासगी रुग्णालयांने गोरगरीबांकडून लाखो रुपये बीलापोटी घेतले आहेत. ते पैसे त्या रुग्णांना या वीस लाख कोटींमधून परत दिले पाहिजेत. तसेच या सर्व रुग्णालयांचे शासकीय लेखा परिक्षण केले पाहिजे अशी मागणी अनिल जाधव यांनी केली.

वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष देवेंद्र तायडे म्हणाले की, ‘वैद्यकीय, आरोग्य विभागातील नोकर भरतीला फाटा आणि ठेकेदारांना वाटा’ हा पिंपरी चिंचवड शहरातील भाजपाचा अजेंडा आहे. हे आम्ही कदापी होऊ देणार नाही. या मनपातील भाजपा राष्ट्रवादीच्या भ्रष्ट युतीला सक्षम पर्याय म्हणून वंचित बहुजन आघाडी आगामी निवडणूकीत मतदारांपुढे जाणार आहे. श्रावण हर्डीकर आयुक्त असताना शहरातील मनपा शाळेत शिकणा-या विद्यार्थ्यांना टॅब देण्याचे जाहिर केले. अद्यापपर्यंत एकाही विद्यार्थ्यांला टॅब मिळाला नाही. गोरगरीबांना तीन हजार रुपये देऊ म्हणाले तेही नंतर नाकारले. परंतू कोरोना काळात कोणतीही चौकशी न करता, सेवा न देणा-या खासगी रुग्णालयांना, ठेकेदारांना कोट्यावधी रुपये दिले जातात. या भ्रष्टाचा-यांना पायबंद घालण्याचे काम वंचित बहुजन आघाडी करेल. पिंपरी चिंचवड मनपाच्या आयुक्तांची 353 कलमाची दादागिरी, मनमानी, हुकूमशाही चालणार नाही. लोकप्रतिनिधींना भेटणे त्यांचा तक्रारी ऐकुण घेणे हि आयुक्तांची जबाबदारी, कर्तव्य आहे असेही शहराध्यक्ष देवेंद्र तायडे म्हणाले.

Share this: