बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

पिंपरीत उभारणार ज्ञानज्योती सावित्रीबाई फुलेंचा पूर्णाकृती पुतळा; फुले सृष्टीचे उद्या भूमिपूजन 

पिंपरी (वास्तव संघर्ष ): पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पिंपरी चौक येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या शेजारी महात्मा जोतीराव फुले स्मारक येथे भव्य असा ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचा पूर्णाकृती पुतळा उभारणे व फुले सृष्टी उभारण्याच्या ऐतिहासिक कामाचे भूमिपूजन छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या हस्ते मंगळवार (दि.23) सकाळी 10:30 वाजता होणार आहे.

फुले सृष्टीच्या माध्यमातून नागरिकांना महात्मा फुले यांचे शैक्षणिक, सामाजिक कार्य पोहचविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

शहरात सावित्रीबाई फुले यांचा पुर्णाकृती पुतळा सद्यस्थितीत अस्तित्वात नाही. स्त्री शिक्षणाची जननी म्हणून सावित्रीबाईचे कार्य अनमोल आहे. सावित्रीबाई फुले यांचा पुर्णाकृती पुतळा विशेषतः महिला वर्गास  प्रेरणादायी ठरेल व शहराच्या नावलौकिकातही भर पडणार आहे.

पुतळ्याचा बाजूस जिना व लिफ्ट असणार आहे. पुतळ्याच्यावर आरसीसीमध्ये घुमट असणार आहे. पुतळ्यासमोर 350 लोकांकरिता ओपन एअर थिएटर, स्टेजच्या मागे एलईडी स्क्रीन,कलाकारांसाठी विश्रांती कक्ष,बगीचा कांस्य धातूचे उठाव शिल्प, भिंतीकरीता बांधकाम, जीआरसी कामामध्ये वाडा संकल्पना, पुर्ण परिसराकरीता पेन्सिल संकल्पनेतील सिमाभिंत, स्वच्छतागृह आदी बाबी निर्माण करून सुशोभीकरण केले जाणार आहे.

महात्मा फुले पुतळ्याशेजारी सावित्रीबाई फुले यांचा पुर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार आहे. परिसरात फुले सृष्टी अंतर्गत त्यांच्या जीवनावर आधारित प्रेरणादायक कांस्य धातूतील 12 फूट बाय 8 फूट आकाराचे एकूण 20 म्युरल बसविण्यात येणार आहेत. पुतळ्याच्या दोन्हीही बाजूस विहीर कारंजे, दर्शनी बाजूस ज्ञानज्योती फुल झाडांचा वाफा तसेच, परिसराचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे.

Share this: