बातम्यामहाराष्ट्र

ते ऐकून रात्री झोप येत नाही, आपण गुन्हेगार आहोत असं वाटतं : शरद पवार

मुंबई (वास्तव संघर्ष) : आज वाढदिवसानिमित्त नेहरू सेंटरला आयोजित कार्यक्रमात सर्वांनी माझ्यावर शुभेच्छांच्या केलेल्या वर्षावाने मी भारावून गेलो आहे. यापूर्वी अनेकदा माझा वाढदिवस साजरा झाला. मी पन्नास वर्षांचा झालो तेव्हा नागपूरला विदर्भातील सहकाऱ्यांनी पुढाकार घेऊन वाढदिवस साजरा केला.मी 61 वर्षांचा झालो तेव्हा श्री. भुजबळ यांनी पुढाकार घेऊन नाशिकमध्ये स्व. अटलजींच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा केला. 75 वर्षांचा झालो तेव्हा दिल्लीत राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय मंत्री, राजकीय पक्षांचे अध्यक्ष आणि 15 मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला.

साधारण तुम्ही लक्षात घेतलं तर 50, 61, 75 या तीन टप्प्यावर वाढदिवसाचे कार्यक्रम झाले. पण 81 व्या वाढदिवसाला कार्यक्रम असावा असे काही मला वाटत नव्हते. पण पक्षाने आणि अध्यक्षांनी निर्णय घेतला व तुम्ही सर्वांनी प्रेमाने कार्यक्रम आयोजित केला. त्याबद्दल मी अंतःकरणापासून आपला आभारी आहे. असे शरद पवार यांनी आज वाढदिवसाच्या कार्यक्रमप्रसंगी बोलत होते.

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, मी काल ऐकलेली कविता मला पुर्ण आठवत नाही माञ त्या कवीचे नाव मोतीलाल राठोड असावे, तो कवी बंजारा समाजाचा कार्यकर्ता आहे, त्याने त्याची लहानशी कविता मला सांगितली त्या कवितेचे नाव पाथरवट होय, पाथरवट म्हणजे छन्नी हातात घेऊन हातोड्याने मूर्तीचे दगड फोडणारे पाथरवट,” असं शरद पवारांनी यांनी सांगितलं.

शरद पवार पुढे म्हणाले, “त्या कवितेत त्याने सांगितलं, हा मोठा दगड मी घेतला, माझ्या घामाने त्या दगडाला मूर्ती तयार करण्याचे काम मी केले, ती मुर्ती झाल्यानंतर मी दलित आहे म्हणून मला मंदिरात प्रवेश नाही. ही मूर्ती तुमच्या बापजाद्यांचं प्रतिक आहे,पण त्या मुर्तीचा बापजादा मी आहे. असं असताना त्या मंदिरात तुम्ही मला येऊ देखील देत नाहीत. ही तुमची समाज व्यवस्था आम्हाला उद्ध्वस्त करायची आहे,

अशी एखादी कविता ऐकली की रात्री झोप येऊ शकत नाही. आपण स्वतः गुन्हेगार आहोत असे वाटते. आपण काही केलं असो अथवा नसो, पण आपण त्या समाजाचे प्रतिनिधी आहोत. या समाजातील उपेक्षित वर्गावर जे अत्याचार अन्याय केले त्याची अस्वस्थता त्यांच्या मनात आहे. ती दूर करण्यासाठी खऱ्या अर्थाने प्रयत्नांची परिकाष्टा करण्याची गरज आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता हे सर्व ऐकल्यावर अस्वस्थ झाला तर तो खरा कार्यकर्ता आहे” असंही शरद पवार यांनी नमूद केले.

Share this: