बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

दिव्यांग व्यक्तींसाठी असणाऱ्या योजना कार्यान्वित करा : वैशाली काळभोर

पिंपरी(वास्तव संघर्ष) : दिव्यांग व्यक्तींसाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नागरवस्ती विभाग विभागाद्वारे अनेक कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. यामध्ये संत गाडगे महाराज दिव्यांग कल्याणकारी योजनेद्वारे दोन दिव्यांग व्यक्तीने अदिव्यांग व्यक्तीशी विवाह केल्यास अशा जोडप्यांना एक लाख रुपये रोख रक्कम आणि दिव्यांग व दिव्यांग अशा व्यक्तीने विवाह केल्यास त्यांना रोख दोन लाख रुपये अर्थसहाय्य देण्यात येते. मात्र या योजनेची अंमलबाजवणी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने अद्याप केली नाही.

त्यामुळे शेकडो दिव्यांग व्यक्ती या लाभापासून वंचित राहत आहेत तरी ही योजना पूर्ण क्षमतेने ताबडतोब सुरू करावी अशी मागणी ज्येष्ठ नगरसेविका व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पिंपरी चिंचवड महिला माजी शहराध्यक्ष वैशाली काळभोर यांनी आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

सोमवार दिनांक 21 फेब्रुवारी रोजी वैशाली काळभोर यांनी आयुक्त पाटील यांना दिलेल्या पत्रात पुढे म्हटले आहे की, दिव्यांग व्यक्ती बरोबर अदिव्यांग व्यक्तीने विवाह केल्यास त्यांना प्रोत्साहनपर एक लाख रुपये अर्थसहाय्य देणे तसेच दिव्यांग व्यक्तीने दिव्यांग व्यक्तीशी विवाह केल्यास अशा नवविवाहित जोडप्याला संसारात मदत व्हावी या उद्देशाने एकरकमी दोन लाख रुपये अर्थसहाय्य देणे अशी नवीन योजना पिंपरी चिंचवड महानगरपालिके द्वारे सुरु करण्यासाठी 12 जून 2019 रोजी मान्यता देण्यात आलेली आहे. अद्यापही ही योजना सुरू झालेली नाही. तरी या योजनेपासून दिव्यांग व्यक्ती वंचित राहणार नाहीत याकरिता आयुक्तांनी स्वतःच्या अधिकारात ही योजना लवकरात लवकर सुरू करून दिव्यांग व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळवून द्यावा अशीही मागणी नगरसेविका वैशाली ताई काळभोर यांनी या पत्रात केली आहे.

Share this: