बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

प्रारूप प्रभागरचना हरकती व सूचनांवर सुनावणी संपन्न

पिंपरी (वास्तव संघर्ष) : पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2022 च्या  पार्श्वभूमीवर प्रारूप प्रभागरचनेवर नोंदविण्यात आलेल्या हरकती आणि सूचनांवर आज शुक्रवार (दि.25) फेब्रुवारीला सुनावणी पार पडली.यासाठी राज्याचे सहकार आयुक्त आणि सहकारी संस्थांचे निबंधक अनिल कवडे यांची राज्य निवडणूक आयोगाने प्राधिकृत अधिकारी म्हणून नेमणूक केली होती. प्राप्त झालेल्या हरकती आणि सूचनांवर  त्यांनी सुनावणी घेतली. महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्यासह राज्य निवडणूक आयोगाचे उपायुक्त अविनाश सणस, विधी सहाय्यक अॅड. सुरज चकोर, पुणे विभागीय आयुक्त यांचे प्रतिनिधी अप्पर जिल्हाधिकारी वर्षा उंटवाल, पुणे जिल्हाधिकारी यांचे प्रतिनिधी अप्पर जिल्हाधिकारी नयना बोंदार्डे, महापालिका अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, सहाय्यक आयुक्त बाळासाहेब खांडेकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली.

राज्य निवडणुक आयोगाच्या सूचनेनुसार महापालिकेची प्रारूप रचना 1 फेब्रुवारीला जाहीर करण्यात आली होती.  यावेळी राज्य निवडणूक आयोगाने मान्य केलेले प्रारुप नकाशे अणि प्रभाग रचना आदी सूचना प्रसिध्द करण्यात आली होती. 14 फेब्रुवारीपर्यंत नागरिकांमार्फत त्यावर हरकती आणि सूचना घेण्याकामी मुदत देण्यात आली  होती.  या कालावधीत सुमारे 5 हजार 684 हरकती आणि सूचना प्राप्त झाल्या.  या प्राप्त झालेल्या हरकती आणि सूचनांवर चिंचवड येथील ऑटो क्लस्टर येथे सकाळी 10 वाजेपासून सुनावणीला सुरुवात झाली.  या सुनावणीचे वेळापत्रक महापालिकेच्या www.pcmcindia.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले होते. शिवाय हरकतदारांना या सुनावणीची नोटीसदेखील पाठवण्यात आली होती. जिल्हाधिकारी आलेल्या हरकतींवर 96 ग्रुप मध्ये विभागणी करण्यात आली होती. या सर्व ग्रुपमधील हरकतदार सुनावणीला उपस्थित होते, त्यांच्या हरकती यावेळी ऐकून घेण्यात आल्या. सुनावलीला उपस्थित राहिलेल्या हरकतदारांनी राज्य निवडणूक आयोगाने प्राधिकृत केलेल्या अधिका-यांसमोर आपले म्हणणे, हरकती आणि सूचना मांडल्या.

या सुनावणी व्यवस्थापनासाठी सहशहर अभियंता रामदास तांबे, सहाय्यक नगररचना उपसंचालक प्रशांत शिंपी, कार्यकारी अभियंता प्रमोद ओंभासे, शिरिष पोरेडी, बापूसाहेब गायकवाड, शशिकांत मोरे, माहिती तंत्रज्ञान अधिकारी विजय बोरुडे, जनसंपर्क अधिकारी किरण गायकवाड, कार्यालयीन अधिक्षक रमेश डाळींबे आदींनी कामकाज पाहिले.

Share this: