शिवसेना राष्ट्रवादीच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त; पिंपरी चिंचवडमध्ये भाजपचा जल्लोष
पिंपरी (वास्तव संघर्ष) : उत्तरप्रदेश, गोवा, मणिपूर आणि उत्तराखंडमधील विधानसभा निवडणुकीनंतर देशातील नागरिक पुन्हा एकदा भाजपासोबत आहेत, हे सिद्ध झाले आहे. पिंपरी-चिंचवड या विजयाची पुनरावृत्ती होईल, असा विश्वास महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी व्यक्त केला.
पिंपरी-चिंचवड भारतीय जनता पार्टीच्या वतीने पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आनंदोत्सव साजरा करण्यात आला. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी मध्यवर्ती कार्यालयासमोर एकत्र येवून एकमेकांना पेढे वाटून अभिनंदनही केले.
यावेळी नगरनगर विकास प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, प्रदेश सचिव अमित गोरखे, स्थायी समिती सभापती नितीन लांडगे, नगरसेविका अनुराधा गोरखे, संघटन सरचिटणीस अमोल थोरात, सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, राजू दुर्गे, विजय फुगे आदी उपस्थित होते.
उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, उत्तराखंड आणि मणिपुर या पाच राज्यांतील चित्र आता जवळपास स्पष्ट होत आहे. पाच राज्यांपैकी 4 राज्यात भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. गोवा राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. त्यामुळे आगामी काळात भाजपा पूर्ण बहूमत मिळवून भाजपा पुन्हा एकदा शहराच्या विकासासाठी सज्ज होईल, असा विश्वासही महापौर ढोरे यांनी व्यक्त केला.