बातम्या

अपघात झालेल्या गाड़ीचे नुकसान भरून न दिल्याच्या कारणावरून गोळीबार

अपघात झालेल्या गाड़ीचे नुकसान भरून न दिल्याच्या कारणावरून गोळीबार

चाकण-अपघात झालेल्या गाड़ीचे नुकसान भरून न दिल्याच्या कारणावरून समोरच्या कारमधील व्यक्तीवर गोळीबार करण्यात आला.ही घटना आंबेठाण गावात शुक्रवारी (दि. 21) रात्री सव्वाअकराच्या सुमारास घडली. सुदैवाने घटनेत कोणीही जखमी झाले नाही.  

शांताराम दत्तात्रय चव्हाण (वय 33, रा. आंबेठाण, ता. खेड) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार निलेश उर्फ जग्गुभाई नवनाथ मांडेकर (वय २८ , रा. आंबेठाण, ता. खेड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी शांताराम शुक्रवारी रात्री त्यांच्या मावस भावाच्या मित्राची चारचाकी घेऊन जात होते. आंबेठाण गावाच्या हद्दीत त्यांच्या चारचाकी गाडीचा आरोपी निलेश याच्या चारचाकी गाडीला धडक बसल्याने अपघात झाला.
या अपघातात दोन्ही गाड्यांचे नुकसान झाले. मात्र निलेश याने शांताराम यांच्याकडे गाडीची नुकसान भरपाई मागितली. शांताराम यांनी आरोपी निलेश याला नुकसान भरपाई दिली नाही. यावरून निलेश याने त्याच्या जवळ असलेल्या पिस्तुल मधून शांताराम यांच्यावर गोळी झाडली. शांताराम यांच्यासोबत त्यांचा चुलत भाऊ गणेश चव्हाण होता. निलेश गोळी झाडत असताना गणेश मोठ्याने ओरडला आणि त्याने निलेशच्या हाताला धक्का दिला. यामुळे हवेत गोळीबार झाला. त्यानंतर निलेश याने शांताराम यांना मारहाण केली. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण पोलिसांनी आरोपी निलेश याला अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक पासलकर तपास करीत आहेत

Share this: