वायसीएम’ मृतदेह अदलाबदली प्रकरणी एक कर्मचारी बडतर्फ
पिंपरी (वास्तव संघर्ष) : यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयातील डेड हाऊसमधून महिलांच्या मृतदेहाची अदलाबदली झाल्याप्रकरणी दोषी कंत्राटी कर्मचाऱ्यास कामावरून काढून टाकण्यात आले आहे. तर, पालिका आस्थापनेवरील एका कर्मचाऱ्याची विभागीय चौकशी करण्यात येत आहे. संबंधित ठेकेदारावरही कारवाई केली जाणार आहे, असे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी सोमवारी (दि. 10) सांगितले.
पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात अदलाबदलीचा प्रकार 19 ऑक्टोबर 2022 ला घडला होता. त्यामुळे शहरात एकच खळबळ माजली होती. त्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आयुक्त सिंह यांनी अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नियुक्ती केली होती. त्या समितीला सात दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. तब्बल दोन महिन्यांनंतर तो अहवाल आयुक्तांसमोर सादर करण्यात आला. प्रशासनाच्या कारभारामुळे ते प्रकरण दाबल्याची चर्चा सुरू होती. त्याबाबत विचारले असता आयुक्त बोलत होते.
आयुक्त सिंह म्हणाले की, चौकशी अहवालानुसार डेड हाऊसमधील कंत्राटी कर्मचाऱ्यास तात्काळ काढून टाकण्यात आले आहे. तर, पालिका आस्थापनेवरील कर्मचाऱ्याची विभागीय चौकशी करण्यात येत आहे. संबंधित ठेकेदारावर कारवाई जाणार आहे. दोषी पोलिस कर्मचाऱ्यांबाबत पोलिस आयुक्तांना कळविण्यात आले आहे