भाजपनं माझा वापर केला संपुर्ण देशाला माहिती , महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तर माझ्या मनातून उतरलेत-आण्णा हजारे.
राळेणसिद्धी –
‘भाजपनं माझा वापर केला हे संपूर्ण देशाला माहीत आहे.दिल्लीतील रामलीला मैदानावर लोकपाल व लोकायुक्तांसाठी जे आंदोलन झाले होते त्यामुळेच आजचे भारतीय जनता पार्टी चे सरकार सत्तेवर आले . त्या आंदोलनामुळंच जनतेनं सत्तांतर केलं होते. त्याच जनतेसोबत आज सरकार गद्दारी करत आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तर माझ्या मनातून उतरलेत अशी खोचक टीका आण्णा हजारे यांनी केली आहे .
लोकपाल कायद्याच्या अंमलबजावणीसाठी अण्णांनी सुरू केलेल्या आंदोलनाचा आज सहावा दिवस आहे. मात्र, अद्यापही सरकारकडून ठोस काहीही आश्वासन देण्यात आलेले नाही. आणि दुसरीकडे सरकारनं अण्णांच्या ९० टक्के मागण्या मान्य केल्याचंही वृत्त आहे. या पार्श्वभूमीवर अण्णांनी स्वत: पत्रकारांसमोर याबाबत खुलासा केला. शब्द न पाळण्याच्या बाबतीत काँग्रेसनं डॉक्टरेट केलीय, तर भाजप ग्रॅज्युएट आहे. माझ्या ९० टक्के मागण्या मान्य झाल्याचं खोटं सांगितलं जातं आहे. सरकार जनतेची दिशाभूल करत आहे . मागण्या मान्य झाल्यानंतरही उपोषण करायला मला वेड लागले आहे का? असा खडा सवालही अण्णांनी यावेळी केला.
‘केंद्रातील मंत्री व मुख्यमंत्री आज भेटण्यासाठी येणार होते. पण मी त्यांना येऊ नका असं सांगितलं त्यांच्या येण्यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. प्रश्न सुटले आहेत, असा लोकांचा समज होतो. त्यामुळं ठोस निर्णय होईपर्यंत येऊ नका. ठोस निर्णय घेऊन लेखी द्या,’ असा निरोप दिल्याचे अण्णा म्हणाले