क्राईम बातम्याबातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

संतापजनक: अनैतिक संबंधातून आईनेच केला पोटच्या मुलीचा खून

पुणे (वास्तव संघर्ष) :काही दिवसांपूर्वी एका मृत चिमुकलीचा खडकी रेल्वे स्थानकाच्या जवळ मृतदेह सापडला होता. या चिमुकलीचा खून जन्मदात्या आईनेच केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.अनैतिक संबंधातून हा खून झाल्याचे निष्पन्न झाले आहे. युनिट चारच्या पोलिसांनी नराधम आई व तिचा प्रियकर याला रविवारी (दि.5) रोजी दुपारी अटक करण्यात आली आहे.

आरोपी संतोष देवमन जामनिक (वय-25) लक्ष्मी संतोष गवई (वय-26 दोघेही रा. खेरपुडी ता.बाळापूर जि.अकोला. सध्या वैदुवस्ती, पिंपळे गुरव पुणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरूवारी (दि.2) रोजी खडकी रेल्वे स्टेशन ते खडकी बाजार रोडच्या दरम्यान सीएफडी मैदानाजवळ दोन वर्षाच्या चिमुकल्या बालिकेचा मृतदेह सापडला होता.या प्रकरणी खडकी पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला होता. खुनाच्या गंभीर घटनेमुळे खडकी तसेच पुणे शहर परिसरात एकच खळबळ उडाली होती.घटनास्थळी कोणताही पुरावा नसल्यामुळे तसेच मृत मुलीची कोणतीही ओळख न पटल्यामुळे या गंभीर गुन्ह्याचा तपास करणे अवघड होते. दरम्यान दाखल गुन्ह्याचा खडकी पोलीस व गुन्हे शाखा समांतर तपास करीत होते. युनिट चारच्या तपास पथकाकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी 50 पेक्षा जास्त सीसीटीव्ही फुटेजचा बारकाईने अभ्यास करून संशयित आरोपी निष्पन्न केले.

त्यावरून अकोला येथील पोलीस अधिकाऱ्यांना पुणे शहर पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संपर्क करून आरोपींचा शोध घेण्यासाठी मार्गदर्शन केले.आरोपी संतोष व लक्ष्मी हे एकाच गावातील असून त्यांचे पूर्वीपासूनच अनैतिक संबंध होते. त्या दोघांनी गावातून पुण्याला पळून जाण्याचे ठरविले. पुण्याला येत असताना लक्ष्मी हिने तिच्यासोबत दोन वर्षाच्या लहान मुलीला घेतले. या कारणावरून रेल्वेमध्ये दोघांची भांडणे झाली.

यामध्येच दोघांनी एक तारखेला मध्यरात्रीच्या सुमारास प्रवासादरम्यान तिचा गळा आवळून खून केला. त्यानंतर खडकी रेल्वे स्टेशन येथे उतरून पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह मोकळया मैदानात टाकून दोघेही आरोपी फरार झाले. या गंभीर गुन्ह्याचा तपास करत असताना सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपींचा मूळ गावी शोध घेऊन पुण्यातून पुन्हा पळून जात असताना रविवारी दुपारी ताब्यात घेण्यात आले. याबाबत अधिक तपास खडकी पोलीस करीत आहेत.

Share this: