मोठी बातमी: पिंपरी चिंचवड भाजप शहराध्यक्षपदी शंकर जगताप
पिंपरी(वास्तव संघर्ष :महाराष्ट्र भाजपमध्ये पुनर्रचना होणार असल्याने पिंपरी-चिंचवड भाजपमध्येही खांदेपालट होणार असल्याची चर्चा आहे. पिंपरी-चिंचवड भारतीय जनता पार्टीचे विद्यमान शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांचा शहराध्यक्षपदाचा कार्यकाळ कधीच संपुष्टात आलेला आहे. त्यामुळे आता चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप यांच्या नावाची शहराध्यक्षपदासाठी चर्चा आहे. शंकर जगताप यांनी नुकत्याच झालेल्या चिंचवड विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत आपल्या नेतृत्वाची चुणूक दाखवली. ते पोटनिवडणुकीतील भाजपच्या विजयाचे शिल्पकार ठरले होते. त्यामुळे आता त्यांच्याकडे शहराध्यक्षपदाची जबाबदारी दिली जाणार असल्याचे बोलले जात आहे.
2014 च्या विधानसभा निवडणुकीनंतर पिंपरी-चिंचवडमध्ये भारतीय जनता पार्टीला अच्छे दिन आले आहेत. चिंचवड मतदारसंघाचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप हे शहरातील भाजपचे पहिले आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर त्यांच्याकडे भारतीय जनता पार्टीने शहराध्यक्षपदाची जबाबदारी दिली. या संधीचे सोने करत दिवंगत लक्ष्मण जगताप यांनी 2017 मध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपची प्रथमच सत्ता आणून दाखवली. त्यांनी स्पष्ट बहुमतासह महापालिकेत भाजपचे कमळ फुलवले.
शहराध्यक्षपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या पक्षश्रेष्ठींनी दुसऱ्यांदाही दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनाच शहराध्यक्ष होण्याचा आग्रह धरला होता. परंतु, त्यांनी विनम्रतापूर्वक नकार देत दुसऱ्या कोणाला तरी शहराध्यक्षपदी संधी देण्याची सूचना केली. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनी शहराध्यक्षपद नाकारल्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्याकडे या पदाची जबाबदारी सोपवली. त्यांचाही शहराध्यक्षपदाचा कार्यकाळ संपला आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड भारतीय जनता पार्टीमध्ये शहराध्यक्ष बदलाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रदेश भाजपमध्ये पुनर्ररचना होणार असल्याचे सांगितले आहे. त्यानुसार पिंपरी-चिंचवड भाजपमध्येही खांदेपालट होणार असल्याचे म्हटले जात आहे. भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप यांना शहराध्यक्षपद देण्यासाठी राज्यातील वरिष्ठ नेत्यांनी हिरवा कंदील दाखवला असल्याची चर्चा आहे. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे चिंचवड विधानसभा मतदारसंघात नुकतीच पोटनिवडणूक झाली. त्यामध्ये भाजपचा विजय झाला. या विजयाचे खरे शिल्पकार शंकर जगताप असल्याचे उघड आहे.
शंकर जगताप नसते तर चिंचवड मतदारसंघात भारतीय जनता पार्टीची कसब्यासारखी अवस्था झाली असती, असे राजकीय जाणकारांचे मत आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड भारतीय जनता पार्टीला शहरात आणखी एक नेतृत्व मिळाल्याचे बोलले जाते. त्यांची चिंचवड आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघावर पकड आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या शहर नेतृत्वाची धुरा शंकर जगताप यांच्याकडे सोपवली जाणार असल्याची चर्चा आहे.