बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यावर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करा; पूर्वनियोजन बैठकीत मागणी

पिंपरी (वास्तव संघर्ष): क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार प्रबोधन पर्वामध्ये आयोजित करण्यात येणारे  कार्यक्रम आणि उपक्रम  समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी महापालिका प्रयत्नशील असून विविध संघटना, संस्था आणि नागरिकांनी या प्रबोधनाच्या चळवळीत सहभाग घेऊन आपले योगदान द्यावे, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी केले.क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार प्रबोधन पर्वाच्या आयोजनासंदर्भात  अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांच्या अध्यक्षतेखाली आज पूर्वनियोजन बैठक पार पडली, त्यावेळी ते बोलत होते.

या बैठकीस उपआयुक्त रविकिरण घोडके, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, क्षेत्रीय अधिकारी सुचेता पानसरे, विजय थोरात, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, कार्यकारी अभियंता रविंद्र पवार, विशेष अधिकारी किरण गायकवाड, माजी नगरसेवक संतोष लोंढे, अंबरनाथ कांबळे, गोरक्ष लोखंडे, विश्वास गजरमल, कर्मचारी महासंघाचे मनोज माछरे, कामगार नेते निवृती आरवडे, तुकाराम गायकवाड, बाणाई संघटनेचे विजय कांबळे, चंद्रकांत पाटील, सामाजिक कार्यकर्ते बापूसाहेब गायकवाड, आनंदा कुदळे, उत्तम कांबळे, बाळासाहेब रोकडे, सुरेश निकाळजे, भाऊसाहेब डोळस, विनोद गायकवाड, मुकुंद रणदिवे,  रजनीकांत क्षीरसागर, संतोष जोगदंड, दशरथ ठाणाबीर, गुलाब पानपाटील, ईश्वर कांबळे, नितीन गवळी, गोपाल मोरे, नितीन घोलप, विकास कडलक, मंदाकिनी गायकवाड, विशाल कांबळे, राम ठोके, संगीता भंडारे, डॉ. किशोर खिल्लारे, मनोज गरबडे, विजय ओहोळ, राहुल ओव्हाळ, राजेंद्र साळवे, मनोज गजभार, शामा जाधव, सुचित्रा गायकवाड, मनीषा साळवे, संजय ससाणे, मिलिंद कांबळे, विनोद सरोदे, राम भंडारे, प्रकाश डोळस, धीरज वानखडे, प्रकाश बुक्तर, राम बनसोडे, सोनू शेळके, शोभा दहिफळे, दामू चंदनशिवे आदींसह विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर स्मारक समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
    
पिंपरी येथील पुतळ्यावर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करावी,  विचार प्रबोधन पर्वामध्ये दर्जेदार कार्यक्रमांचा समावेश असावा, स्थानिक कलाकारांना संधी द्यावी, कायदेतज्ञ अर्थतज्ञ जलतज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशी मांडणी करणारे कार्यक्रम घ्यावेत, कार्यक्रमाची व्यापक प्रसिध्दी करावी, दापोडी भागात देखील कार्यक्रम घ्यावेत, विद्यार्थ्यांसाठी स्पर्धांचे आयोजन करावे, सर्व शाळांमध्ये महापुरुषांची जयंती साजरी व्हावी यासाठी महापालिकेने पुढाकार घ्यावा, आरोग्य तपासणी तसेच रक्तदान शिबीर आयोजित करावे, कार्यक्रम परिसरात स्वच्छतेविषयी दक्षता घ्यावी,  उद्योजकता आणि रोजगार प्रशिक्षण शिबीर घ्यावे, कौशल्य आणि विकासात्मक उपक्रम राबवावे, पुतळा परिसरात  विद्युत रोषणाई करावी आदी सूचना उपस्थितांनी या बैठकीत मांडल्या.

अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप म्हणाले,  महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ख-या अर्थाने साजरी करण्यासाठी लोकाभिमुख उपक्रम राबविण्याकडे महापालिकेचा कल असेल. आपले शहर स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी महापालिका प्रयत्न करीत आहेत. देश आणि संविधानाप्रती आपली निष्ठा दाखविण्यासाठी या शहरात वेगळा आदर्श निर्माण केल्याचा संदेश सर्वत्र जाण्यासाठी प्रत्येकाचा सहभाग आणि योगदान आवश्यक असून महामानवांच्या विचारांचा प्रचार प्रसार करण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा असे आवाहन अतिरिक्त आयुक्त जगताप  यांनी केले.

Share this: