पिंपरीतील इंदिरा गांधी उड्डाणपुलाची होणार दुरुस्ती;उद्यापासून वाहतुक नियमात बदल
पिंपरी (वास्तव संघर्ष) :पिंपरी चिंचवड शहरातील महत्त्वाचा मानला जाणारा इंदिरा गांधी उड्डाणपुलाचे दुरुस्ती काम होणार आहे. त्यामुळे वाहतूक सुरळीत होण्याच्या अनुषंगाने वाहतूक विभागाकडून वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. दिनांक 21 पासून म्हणजे उद्यापासून ९ ० दिवसाकरीता वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. पिंपरी चिंचवड वाहतूक शाखेचे उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी याबाबत आदेश दिले.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले की, पिंपरीतील इंदिरा गांधी उड्डाणपुल दुरुस्ती करण्याचे कामामध्ये पहिल्या टप्प्यातील गोकुळ हॉटेल ते पिंपरी पुलापर्यंतचे काम करण्याचे नियोजीत आहे.त्याकरीता वाहतूकीत बदल करण्यात आले आहे . ज्याअर्थी पिंपरी चिंचवड शहरातील वाहतुक सुरक्षित व सुरळीतपणे होणेकरीता , महाराष्ट्र शासन गृह विभाग क्र . एम . व्ही . ए . ०१ ९ ६ / ८७१ / सी आर – ३७ / टी आर ए २७ / ० ९ / १ ९९ ६ चे नोटीफिकेशन नुसार मोटार वाहन कायदा कलम ११५ , ११६ ( १ ) ( ए ) ( बी ) , ११६ ( ४ ) आणि ११७ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करुन सदर कामाकरीता दिनांक 27-1 2021 पासुन ९ ० दिवसाकरीता खालील प्रमाणे वाहतूकीत तात्पुरते बदल करण्यात येत आहेत .
पिंपरी वाहतुक विभाग अंतर्गत इंदिरा गांधी उड्डाणपुल पिंपरी दुरुस्ती कामामध्ये पहिल्या टप्प्यातील गोकुळ हॉटेल ते पिंपरी पुलापर्यंतचे काम पुर्ण होईपर्यंत पिंपरी चौकाकडून पिंपरी पुलाकडे जाणारी वाहतुक ही अहिल्यादेवी चौक मार्गे पिंपरी पुलाकडे वळविण्यात येत आहे व पहिल्या टप्प्यातील पुलाचे कामाचे दरम्यान अहिल्यादेवी चौक ते पिंपरी पुला दरम्यानची वाहतुक दुहेरी मार्गाने राहील . तसेच पुलाखाली राहणारे स्थानिक नागरिक , व्यवसायीक क्रोमा शोरुम मार्गे इच्छित स्थळी जातील . असेही त्यांनी आदेशात म्हटले आहे.