बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

महापौर चषक क्रीडा स्पर्धेत लाखोंचा घोटाळा;पालिका आयुक्त आणि क्रीडा अधिकारी प्रमुख सूत्रधार?

पिंपरी (वास्तव संघर्ष ) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने आयोजित महापौर चषक आंतरशालेय क्रीडा स्पर्धेवर कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. मात्र स्पर्धेत सहभागी खेळाडूंना पिण्याचे पाणी सुद्धा महापालिका प्रशासन पुरवू शकले नाही. त्यामुळे खेळाडूंचे प्रचंड हाल झाले. एक प्रकारे त्यांचा छळच करण्यात आला. त्यामुळे स्पर्धेवर केला जाणारा खर्च कोणाच्या खिशात जाणार आहे?, असा प्रश्न खेळाडूंना पडला आहे. तसेच खेळाडूंना कीट वाटप करणार असल्याचे सांगून केवळ निकृष्ट दर्जाचे टी-शर्ट आणि हाप पँट देऊन त्यांच्या तोंडाला पाने पुसण्यात आली. यासंदर्भात क्रीडा समिती सभापती आणि उपमहापौर तुषार हिंगे यांना विचारले असता “खेळाडू घडवायचे नाहीत का?”, असा उलट सवाल पत्रकारांना करत स्पर्धेतील गैरप्रकाराला पाठीशी घातले. या स्पर्धेच्या गैरप्रकारात महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त अजित पवार, सहाय्यक आयुक्त संदीप खोत, क्रीडा अधिकारी रज्जाक पानसरे यांचाच सहभाग असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात आहे.

महापालिकेच्या क्रीडा विभागाच्या वतीने १२ जानेवारी ते २ फेब्रुवारीदरम्यान महापौर चषक आंतरशालेय क्रीडा स्पर्धा २०२० चे आयोजन करण्यात आले होते. विविध २० प्रकारच्या खेळांसाठी आयोजित या स्पर्धेत महापालिकेच्या आणि खासगी प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थी खेळाडूंनी सहभागाची मुभा देण्यात आली होती. शहराच्या वेगवेगळ्या मैदानांवर फुटबॉल, कबड्डी, खो-खो, अॅथलेटिक्स, बुद्धीबळ, बॅडमिंटन, व्हॉलिबॉल, जलतरण, स्केटिंग, हॉकी, कुस्ती, थ्रोबॉल, योगा, क्रिकेट, बास्केटबॉल, हँडबॉल, कराटे, बॉक्सिंग, किक बॉक्सिंग आणि तायक्वांदोच्या स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेसाठी १ कोटींहून अधिक रक्कमेचा खर्च करण्यात येणार आहे.

एवढा मोठा खर्च केला जात असल्याने स्पर्धेत सहभागी खेळाडूंना पिण्याचे पाणी, नाष्टा किंवा जेवण मिळणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात खेळाडूंना नाष्टा किंवा जेवण दूरची गोष्ट साधे पिण्याचे पाणी सुद्धा पुरविण्यात आले नाही. त्यामुळे स्पर्धेत खेळण्यासाठी आलेल्या खेळाडूंचे प्रचंड हाल झाले. एवढेच नाही तर स्पर्धा व्यवस्थित पार पाडणाऱ्या पंचांना चहा पाजण्याचे सौजन्यही दाखविण्यात आले नाही. काही स्पर्धांच्या ठिकाणी खेळाडूंना निकृष्ट दर्जाचे जेवण पुरविण्यात आले. त्यामुळे खेळाडूंनी उपाशी राहून जिद्दीने खेळणेच पसंत केले. स्पर्धेच्या ठिकाणी सोयीसुविधाच पुरविल्या न गेल्याने महापालिकेने कोट्यवधींचा खर्च कोणत्या कारणासाठी केला?, असा प्रश्न खेळाडूंना पडला आहे.

महापालिकेने ही स्पर्धा पार पाडण्याची जबाबदारी एका खासगी संस्थेला दिली होती. ही संस्था रिलायन्स या मोठ्या कंपनीच्या इव्हेंट मॅनेजमेंटचे काम करते, असे सांगण्यात आले. परंतु, या संस्थेला स्पर्धेच्या ठिकाणी खेळाडूंना पाणी पुरविण्याचे काम सुद्धा व्यवस्थित करता आले नाही. केवळ इव्हेंट म्हणून ही स्पर्धा पार पाडण्याचे सोपस्कार संस्थेने पूर्ण केले आहेत. त्यामुळे या संस्थेला कोणत्या कामाचे पैसे महापालिका अदा करणार आहे?, असा प्रश्न खेळाडूंना पडला आहे. धक्कादायक बाब म्हणजे एखादी क्रीडा प्रकाराची स्पर्धा तीन दिवस चालली असेल, तर ती सहा दिवस चालल्याचे दाखवून पंचांना देण्यात येणाऱ्या मानधनातील रक्कम लाटण्याचा डाव आखण्यात आला आहे.

स्पर्धेत सहभागी महापालिका शाळांमधील खेळाडूंना क्रीडा साहित्याचा समावेश असलेल्या कीटचे वाटप करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात या खेळाडूंना निकृष्ट दर्जाचे एक टी-शर्ट आणि हाप पँट देऊन त्यांच्या तोंडाला पाने पुसण्यात आली आहेत. या सर्व प्रकाराबाबत क्रीडा समिती सभापती आणि उपमहापौर तुषार हिंगे यांना विचारले असता काही चुका झाल्याचे मान्य करून “आम्ही खेळाडू घडवायचे नाहीत का”?, असा उलटा प्रश्न पत्रकारांना विचारला. त्यामुळे महापौर चषक आंतरशालेय क्रीडा स्पर्धा २०२० म्हणजे घोटाळ्याची स्पर्धा असल्याची टीका आता होऊ लागली आहे. लाखोंचा घोटाळा करण्यासाठीच आयोजित केलेल्या या स्पर्धेचे मुख्य सूत्रधार महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त अजित पवार आणि सहाय्यक आयुक्त संदिप खोत, क्रीडा अधिकारी रज्जाक पानसरे असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात आहे. या सर्व प्रकाराबाबत विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी आणि शिवसेनेने गांधीरीची भूमिका घेतलेली आहे. कुंपणच शेत खात असल्याने करदात्या नागरिकांसमोर आता तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करण्याचाच पर्याय उपलब्ध आहे.

Share this: