बातम्या

मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या व मोर्चात सहभागी झालेल्या प्रत्येकाचा हा विजय: रामभाऊ जाधव

छावा मराठा संघटनेकडून न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत
 
पिंपरी, प्रतिनिधी :
मराठा आरक्षणाच्या निर्णयामुळे मराठा समाजाला शिक्षण, नोकरीमध्ये आरक्षण मिळेल व प्रगतीची नवनवी शिखरे गाठणे शक्य होईल. लढा गेल्या ४० वर्षांपासून लढला जात होता. मराठा आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या व मराठा क्रांती मोर्चामध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक व्यक्तीचा हा विजय आहे, असे छावा मराठा संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष तथा कोकण संपर्कप्रमुख रामभाऊ जाधव यांनी सांगितले.
       रामभाऊ जाधव यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, की मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाने विराट ५८ मोर्चे काढत सरकारवर दबाव आणला होता. तब्बल ४० तरुणांनी त्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यानंतर विधिमंडळात एकमताने मराठा आरक्षण कायदा मंजूर करावा लागला. मराठा क्रांती मोर्चाने काढलेल्या शिस्तबद्ध मोर्चाचे यश आहे. आता हे आरक्षण टिकवण्याची जबाबदारी सरकारची आहे. सरकारने सर्वोच्च न्यायालयात हे आरक्षण टिकेल, याची काळजी घेतली पाहिजे. कारण मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाला तब्बल ४० वर्षे लढा द्यावा लागला आहे. या दीर्घ लढाईनंतर सरकारने दिलेल्या आरक्षणाच्या निर्णयावर उच्च न्यायालयाने वैधतेची मोहर उठवली आहे. मधल्या कालावधीत समाजाची केवळ प्रगती खुंटली होती, आपल्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला होता. राज्यात मराठा समाजाची मोठी संख्या आहे. मात्र, आरक्षणाची टक्केवारी कमी आहे. यामध्ये आणखी वाढ होणे आवश्यक आहे. राज्य सरकारने आरक्षणाची तातडीने अंमलबजावणी सुरू करावी. आरक्षणामुळे शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात मागे राहलेल्या मराठा बांधवांना पुढे येण्याची संधी मिळाली आहे, असेही रामभाऊ जाधव यांनी सांगितले.
चौकट :
‘छकुलीच्या मारेकऱ्यांच्या शिक्षेची अंमलबजावणी कधी ?
 
          कोपर्डी प्रकरणानंतर मराठा समाज एकत्र आला. कोपर्डीमध्ये नराधमांच्या लैंगिक अत्याचाराची शिकार ठरलेल्या छकुलीच्या मारेकऱ्यांना न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. मात्र, त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. त्या छकुलीला न्याय मिळाला पाहिजे, अशी अपेक्षाही रामभाऊ जाधव यांनी व्यक्त केली.
Share this: