पिंपरी चिंचवड हादरलं ; वायसिएम रुग्णालयातील कचराकुंडीत सापडले स्त्री जातीचे अर्भक
पिंपरी (वास्तव संघर्ष): महाराष्ट्र शासन असो किंवा विविध सामाजिक संघटना या सातत्याने स्त्रीभ्रूणहत्या संबंधी जनजागृती करीत आहेत. मात्र तरीही या पुरोगामी महाराष्ट्रात स्त्रीभ्रूण हत्या या कमी होत नाहीत. उलट हे प्रकार रोज कुठे ना कुठे घडत आहेत.
आज शनिवारी (दि.27) रोजी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील कचरा कुंडीत सकाळी एक स्त्री जातीचे अर्भक सापडले आहे. या प्रकाराने शहरात मोठी खळबळ उडाली आहे.नवजात अर्भकाला बघण्यासाठी घटनास्थळी मोठी गर्दी झाली असून पिंपरी पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत.
दरम्यान, हे नवजात अर्भक वायसीएम रुग्णालयातील नाही, त्या स्त्री जातीच्या अर्भकाला रुग्णालयाच्या पाठीमागील गेटमधून येवून कचरा कुंडीत फेकलं आहे. त्यामुळे सदरील नवजात अर्भक कुणी टाकलं, त्याचा शोध आम्ही घेत असून सीसीटीव्ही तपासले जात आहे, असे वायसीएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डाॅ. राजेंद्र वाबळे यांनी सांगितले