क्राईम बातम्यामनोरंजन जगतमाझं पिंपरी -चिंचवड

सावधान…! बांधकाम पाडण्याची धमकी देत पालिकेचे कर्मचारी मागतात नागरिकांकडून हजारो रुपये

चिखली(वास्तव संघर्ष) : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर संकलन विभागातील काही कर्मचाऱ्यांकडून घराची नोंद करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैशाची मागणी केली जात असून, अनधिकृत बांधकामे असल्याचे कारण देऊन नागरिकांची अक्षरक्षः लूट केली जात आहे. मिळकतीची नोंद केल्यानंतर पालिकेला कायमस्वरूपी उत्पन्न सुरू होणार असूनही पालिका कर्मचारी आगाऊ रक्कम कशासाठी मागत आहेत, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. महापालिकेच्या चिखलीतील संकलन कार्यालयाकडून ही लूट न थांबल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा स्वराज्य संघटनेचे पिंपरी-चिंचवड शहर निमंत्रक विजय जरे यांनी दिला आहे.

महापालिकेच्या कर संकलन विभागाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, नागरिक बांधकाम केल्यानंतर रस्ते, सांडपाणी, पाणी इत्यादी पायाभूत सुविधांच्या बदल्यात नागरिक मिळकत कर भरतात. मात्र, मिळकतकर भरण्यासाठी जी नोंद महापालिकेकडे केली जाते. त्या मिळकतीची नोंद करण्यासाठी चिखली येथील करसंकलन कार्यालयातील काही कर्मचाऱ्यांकडून एका गुंठ्या मागे 30 ते 50 हजार रुपये रकमेची मागणी केली जाते. मात्र, या रकमेबाबत नागरिकांकडून विचारणा केली असता तुमचे बांधकाम अनधिकृत आहे. मिळकतीची नोंद करायची असेल तर लिपिकापासून मुख्य कर संकलन अधिकाऱ्यांपर्यंत पैसे द्यावे लागतात. तरच फाइल पुढे सरकते. अन्यथा अनधिकृत बांधकाम असल्याने त्याची नोंद होत नाही. परिणामी, बांधकामपाडावे लागेल तुमचे लाखो रुपये वाया जातील.

त्यामुळे सांगितलेली रक्कम द्या आणि मिळकतीची नोंद करून घ्या, अशी कारणे दिले जातात. अधिकृत बांधकाम असेल तर तुम्हाला भविष्यात तुमचे बांधकाम वाढवता येईल, त्यामुळे पैसे देऊन नोंद करून घ्या आणि पाहिजे त्याप्रमाणे बांधकाम करा अशा प्रकारचा सल्ला करसंकलन विभागातील कर्मचाऱ्यांकडून दिला जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे नोंदीच्या प्रतीक्षेत असलेले अनेक नागरिक पालिका कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत असलेल्या लुटीमुळे हतबल झाले आहेत, हा प्रकार त्वरित थांबविण्यात यावा, अशी मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे.

Share this: