पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाचा चौथा बळी ;शहरामध्ये एकाच दिवशी नवीन 12 रूग्ण कोरोना पाॅझिटिव्ह आढळून आले
पिंपरी (वास्तव संघर्ष) -पिंपरी-चिंचवड शहरातील निगडी ओटास्कीम भागातील 65 वर्षीय पुरुषाचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजपर्यंत कोरोनामुळे शहरात चार रूग्णांचा बळी घेतला आहे.
निगडी ओटास्कीम येथील 65 वर्षीय पुरुषाला कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला आहे. यामुळे कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या चारवर पोहचली आहे.
दरम्यान, पिंपरी चिंचवड शहरातील कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. आज शुक्रवारी 12 जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. यामध्ये रुपीनगर, कोयनानगर भागातील 12 जणांचे कोरोनाचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहे. 18,22, 24, 26, 28, 35 आणि 60 वय वर्ष असलेल्या सात पुरुषांचा समावेश आहे. तर, तीन वर्षाच्या दोन चिमुकल्या, 20, 26 आणि 28 वयवर्ष असलेल्या अशा पाच महिलांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. तर, गुरुवारी रात्री पुरुषाचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. शहरात आतापर्यंत कोरानाने रूग्णांची संख्या 81 पर्यत गेली असून चार जणांचा मृत्यू झाला आहे.