मनोरंजन जगतमाझं पिंपरी -चिंचवड

पिंपरी चिंचवडचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार-आयुक्त शेखर सिंह

पिंपरी (वास्तव संघर्ष) : नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन शहरातील पायाभूत सुविधांची निर्मिती आणि संरचनात्मक आखणी करून शहराच्या नावलौकिकात वाढ करण्यासाठी भर दिला जाणार असून वेगाने वाढणाऱ्या पिंपरी चिंचवड शहराचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन आयुक्त शेखर सिंह यांनी केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आयुक्त पदाचा पदभार आज शेखर सिंह यांनी  स्विकारला. त्यांनतर माध्यमांशीसंवाद साधताना ते बोलत होते.पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनामध्ये पदभार स्विकारण्याची प्रक्रिया  पार पडली. त्यानंतर  अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, उल्हास जगताप यांनी नवनियुक्त आयुक्त शेखर सिंह यांचे स्वागत केले. यावेळी सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.

2012 च्या आयएएस बॅचच्या महाराष्ट्र केडरचे अधिकारी असणारे शेखर सिंह एम.एस.स्ट्रक्चर इंजिनियर आहेत. 2012 मध्ये परिविक्षाधीन कालावधीमध्ये  त्यांनी रामटेक नागपूर येथून प्रशासकीय सेवेला सुरुवात केली. त्यानंतर सहायक जिल्हाधिकारी म्हणून ते ऑगस्ट 2013 पासून  नागपूर येथे कार्यरत होते. सिंधुदुर्ग  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी जून 2015 पासून काम करण्यास सुरुवात केली. जानेवारी 2018 मध्ये ते गडचिरोलीचे  जिल्हाधिकारी म्हणून काम केले. तर जानेवारी 2020 पासून  ते सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते. आज त्यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला. 

प्रारंभी, आयुक्त शेखर सिंह यांनी सर्व विभागप्रमुखांशी औपचारिक संवाद साधत परिचय करून घेतला. प्रामाणिकपणा, कामाप्रती एकनिष्ठता आणि कर्तव्यनिष्ठता महत्वाची असून अधिकाऱ्यांनी नागरिकांशी सौजन्याने वागत आपली सेवा बजवावी अशी सूचना देखील त्यांनी अधिकाऱ्यांना दिली

Share this: